मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वाद पुन्हा एकदा आता चर्चेत आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने कर्णधार म्हणून घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बराच गदारोळ माजला होता. यामध्ये विराट कोहलीने केलेल्या दाव्यानंतर सौरव गांगुली यांना त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवायची होती.
विराट कोहलीने टी-20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडल्यावर सौरव गांगुली यांनी दावा केला होता की, त्यांनी कोहलीला कर्णधारपद सोडू नको असं सांगितलं होतं. मात्र विराट कोहलीने पत्रकार परिषदेत गांगुली यांचा हा दावा खोटा ठरवला. त्यानंतर सौरव गांगुली यांना कारणे दाखवा नोटीस पाठवायची होती, पण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तसं करण्यापासून गांगुली यांना रोखलं.
जय शाह यांनी सौरव गांगुली यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला आणि त्यावेळी विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस न पाठवण्याचा सल्ला दिला.
दरम्यान कोहलीने स्वतः टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बीसीसीआयने त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवलं. यावेळी गांगुली यांनी सांगितलं होतं की, मी कोहलीला टी-20 मध्ये कर्णधारपद कायम ठेवण्यास सांगितलं होतं. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने याचा विरोध केला.
यानंतर एका निवेदनात सौरव गांगुली म्हणाले, हा निर्णय बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी संयुक्तपणे घेतला आहे. बीसीसीआयने विराट कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती, पण त्याने ती मान्य केली नाही आणि मग निवडकर्त्यांनी विचार केला की, मर्यादित ओव्हरमध्ये क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असू नयेत. त्यामुळे विराटला त्या पदावरुन काढण्यात आलं.