मुंबई : दक्षिण आफ्रिका विरुद्ध आज टी 20चा तिसरा सामना आहे. विशाखापट्टणम इथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका 2-0 ने पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये आघाडीवर आहे. आजचा सामना गमवला तर टीम इंडियाच्या हातून सीरिज जाईल. पण पुढचे तिन्ही सामने जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू भुवनेश्वर कुमारला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. तो या खास रेकॉर्डपासून फक्त एक विकेट दूर आहे. एक विकेट घेताच त्याच्या नावावर या रेकॉर्डची नोंद होईल.
सॅमुअल बद्री आणि भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी 20 फॉरमॅटमध्ये पावर प्लेमध्ये प्रत्येकी 33 विकेट्स घेतल्या आहेत. जर भुवीने आता पावर प्लेमध्ये विकेट काढली तर तो पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स काढणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्डची नोंद होईल.
भुवनेश्वर कुमार बद्रीला मागे टाकून पुढे निघून जाईल. त्याने 59 डावात 33 विकेट्स पावर प्लेमध्ये घेतल्या आहेत. तर बद्रीला ह्या विकेट्स घेण्यासाठी 50 डाव खेळावे लागले होते. त्यामुळे भुवीच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात भुवीची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे भुवीकडून टीमला अपेक्षा आहेत.