भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये खेळण्यात व्यग्र आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने आशिया कपच्या सुपर-4 मध्ये स्थान मिळवलं आहे. सुपर 4 साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी झाला. पण हा सामना सुरु होण्याआधीच काही तासांपूर्वी भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली. भारतीय व्यवस्थापनाने सामना सुरु होण्याच्या काही वेळ आधी श्रेयस अय्यर जखमी असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरच्या जागी के एल राहुलला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली. के एल राहुलने या सामन्यात शतक ठोकलं.
बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कोलंबो येथील मैदानात झालेल्या सामन्याआधीच श्रेयस अय्यर जखमी झाली. सरावादरम्यान तो जखमी झाला आहे. त्याची पाठ जखडली आहे.
बीसीसीआयने सांगितलं आहे की, 'सामन्यापूर्वी सराव करताना श्रेयस अय्यरची पाठ जखडली'. पण सूत्रांच्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर नाही. 15 सप्टेंबरला बांगलादेशविरोधात होणाऱ्या सामन्याआधी तो फिट होऊ शकतो.
श्रेयस अय्यर जखमी झाल्यानंतर क्रिकेट चाहते आणि अनेक दिग्गजांनी चिंता व्यक्त केली आहे. यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करणाऱ्या माजी भारतीय क्रिकेट संजय मांजरेकरनेही यावर भाष्य केलं. टॉसनंतर त्याने म्हटलं की "जर असं (श्रेयस जखमी) असेल तर मी श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत आश्चर्यचकित आहे. तो फार काळापासून संघाबाहेर आणि आता तो फिट असल्याचं सांगण्यात आलं होतं".
"पहिल्या सामन्यात पाकिस्ताविरोधात 14 धावा केल्या, तेव्हा तो व्यवस्थित वाटत होता. पण आता त्याची पाठ जखडली आहे. जर कर्णधार आणि संघ व्यवस्थापनासमोर असे मुद्दे असतील तर त्यांनी खेळाडूंवर लक्ष दिलं पाहिजे. आम्ही त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होतो. त्याने पहिला आणि दुसरा सामना खेळला. हे दुर्देवी आहे. पण ईशान किशन खेळतोय याचा आनंद आहे," असं संजय मांजरेकरने म्हटलं.
श्रेयस अय्यर गेल्या अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. नुकतंच त्याच्यावर सर्जरीही करण्यात आली. दुखापतीनंतर तब्बल 6 महिन्याने त्याने संघात पुनरागमन केलं होतं. आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये त्याला संधी देण्यात आली आहे.
श्रेयसने आशिया कपमध्ये 2023 च्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्ताविरोधात सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 14 धावा केल्या होत्या. पण या सामन्यात भारतावर क्षेत्ररक्षणाची वेळच आली नव्हती. कारण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला होता. पण नेपाळविरोधातील सामन्यात त्याने 50 ओव्हर्स क्षेत्ररक्षण केलं होतं. पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.