सरफराजला भारतीय संघात स्थान का नाही? BCCI कडून मोठा गौप्यस्फोट; खरं कारण आलं समोर

Sarfaraz Khan: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (West Indies Tour) भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय आणि कसोटी संघात सरफराज खानला (Sarfaraz Khan) स्थान देण्यात आलं नसल्याने भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी खडे बोल सुनावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 26, 2023, 07:33 AM IST
सरफराजला भारतीय संघात स्थान का नाही? BCCI कडून मोठा गौप्यस्फोट; खरं कारण आलं समोर title=

Sarfaraz Khan: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर (West Indies Tour) जाणार आहे. दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यादरम्यान संघात स्थान देण्यात आलेल्या अनेक खेळाडूंची नावं आश्चर्यचकित करणारी आहेत. 

दरम्यान एकदिवसीय आणि कसोटी संघात सरफराज खानला (Sarfaraz Khan) स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे नाराज झालेले भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी खडे बोल सुनावले आहेत. मात्र बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सरफराजचा फिटनेस फारच खराब असून, मैदानाबाहेर त्याचं वागणंही या निर्णयासाठी जबाबदार आहे. 

सरफराजने रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना गतवर्षी तीन हंगामात 2566 धावा ठोकल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 37 सामन्यात 79.65 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अशा स्थितीत अंडर 19 वर्ल्डकपमध्ये दोन वेळा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूला संघात स्थान न दिल्याने प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे.  

महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघात ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे, ज्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी 42 च्या आसपास आहे. संघ निवडीसी संबंधित एका बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे की, "अशा प्रकारची नाराजी आम्ही समजू शकतो. पण सरफराजला वारंवार दुर्लक्षित करण्यामागे फक्त क्रिकेट कारणीभूत नाही आहे. अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे त्याची निवड केली जात नाही आहे".

'सरफराजला वजन कमी करावं लागेल'

"निवडकर्त्यांना काय समजत नाही का, जे सलग दोन हंगामात 900 हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दुर्लक्षित करतील. संघात स्थान न देण्यामागे त्याचं वजन एक मोठं कारण आहे. त्याचा फिटनेस आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही. सरफराजला यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे आणि वजन कमी करत अधिक फिटनेससह संघात पुनरागमन करावं लागणार आहे. निवड करण्यासाठी फलंदाजी हे एकमात्र निकष नाही".

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरफराजचं मैदानातील आणि मैदानाबाहेरील वागणंही शिस्तीच्या निकषावर बसणारं नाही. त्यांनी सांगितलं की, "मैदानात आणि मैदानाबाहेर त्याचं वागणं योग्य नाही. त्याचे काही शब्द आणि काही भाव शिस्तीच्या दृष्टिकोनातून चांगले नाहीत. आशा आहे की, सरफराज, त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान या गोष्टींवर काम करतील".

रणजीमध्ये दिल्लाविरोधात शतक झळकावल्यानंतर सरफराजने ज्या आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केलं ते निवडकर्त्यांना आवडलं नाही असं बोललं जात आहे. निवड समितीचे तत्कालीन प्रमुख चेतन शर्मा त्यावेळी मैदानात होते. याआधी 2022 रणजी ट्रॉफी फायनलमध्ये त्याच्या वागण्यामुळे मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आणि मुंबईचे माजी दिग्गज खेळाडू चंद्रकांत पंडित नाराज झाले होते. 

आयपीएलमधील खराब प्रदर्शनामुळे सरफराजची निवड झाली नाही का? असं विचारण्यात आलं असता अधिकाऱ्याने सांगितलं की, "मीडियाने हा समज निर्माण केला आहे. जेव्हा मयांक अग्रवाल संघात आला तेव्हा प्रथम श्रेणीत जवळपास 1000 धावा केल्या होत्या. मग काय एमएसके प्रसाद यांच्या समितीने त्याचा आयपीएल रेकॉर्ड पाहिला? हनुमा विहारीसोबतही असंच झालं आहे. घरगुती क्रिकेट खेळल्यानंतर तो ऱाष्ट्रीय संघात आला. भारतीय संघात निवड करताना त्यांचा आयपीएल रेकॉर्ड पाहिला नाही तर मग सरफराजसोबत असं का केलं जाईल?". 

दरम्यान सरफराजला यापुढे संघात स्थान मिळवणं कठीण जाईल असंही अधिकाऱ्याने म्हटलं. गायकवाडसह सूर्यकुमार यादवही संघात स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत. याशिवाय श्रेयस अय्यर दुखापतीपासून सावल्यानंतर त्याचाही दावा मजबूत असेल.