भारतावर आरोप करणं बंद करा, बीसीसीआयने पीसीबीला फटकारलं

न्यूझीलंड आणि इंग्लंडचा दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतावर आरोप केले होते

Updated: Sep 27, 2021, 11:02 PM IST
भारतावर आरोप करणं बंद करा, बीसीसीआयने पीसीबीला फटकारलं title=

मुंबई :  न्यूझीलंड (New Zealand Cricket Team) आणि इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team)  पाकिस्तान (Pakistan) दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये रोष व्यक्त होत आहे. सुरक्षेचा हवाला देत आधी न्यूझीलंड क्रिकेट संघाने ऐन मॅचच्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला. तर इंग्लंडनेही आपला प्रस्तावित दौरा रद्द केला आणि पुरुष आणि महिला संघ पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानची जगभरात नाचक्की

न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या या निर्णयानंतर पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही (PCB) मोठा झटका बसला. यामुळे संतापलेल्या पाकिस्तान सातत्याने यासाठी भारतावर निराधार आरोप करत आहे. पण बीसीसीआयने (BCCI) याबाबात पीसीबीला फटकारलं आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंडचा दौरा रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. पीसीबीचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी दोन्ही देशांवर टीका केली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या काही मंत्री आणि माजी खेळाडूंनी मात्र दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही दोष दिला आहे.

बीसीसीआयने पीसीबीला सुनावलं

सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानला मोठ्या किंवा छोट्या मुद्द्यामध्ये भारताला सामील करण्याची जुनी सवय आहे. 'पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांना आम्ही शुभेच्छा देतो, त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान क्रिकेटने एक नवी उंची गाठावी, तसंच आम्ही स्पष्ट करतो की न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरा रद्द होण्यामागे बीसीसीआयची कसलीही भूमिका नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

'आमच्याकडे या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही, असं बीसीसीआय अधिकाऱ्याने म्हटलं आहे. पाकिस्तानचे काही माजी खेळाडू आयपीएलला दोष देत आहेत. पण न्यूझीलंड आणि इंग्लंडचा दौरा रद्द होण्यामागे आयपीएलचा काय संबंध? हा कसला आरोप आहे? असा सवालही बीसीसीआयने उपस्थित केला आहे.