मुंबई : एशिया कप संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आता एशिया कप श्रीलंकेत नव्हे तर या देशात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी सांगितले की, आशिया चषक संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे, जो आधी श्रीलंकेत होणार होता. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि अशा परिस्थितीत या देशात एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणे शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. "आशिया कप युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे कारण हे एकमेव ठिकाण आहे जेथे पाऊस पडत नाही," असे गांगुली यांनी येथे बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले आहे.
श्रीलंका क्रिकेट (SLC) ने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC)सांगितले की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आशिया कप T20 च्या आगामी आवृत्तीचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. तसेच सध्याच्या संकटामुळे श्रीलंका क्रिकेटने अलीकडेच लंका प्रीमियर लीगचा तिसरा टप्पा पुढे ढकलला होता.
सहा टीम सहभागी होणार
27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका, गतविजेते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी पात्रता स्पर्धेनंतर सहावा आणि अंतिम संघ निश्चित केला जाईल. हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि यूएई या सहा संघांच्या पात्रता स्पर्धेला 20 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
भारत यशस्वी संघ
2022 आशिया कप हा 1984 पासून शारजाह येथे सुरू झालेल्या स्पर्धेचा 15 वा हंगाम असेल. भारत हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने ही स्पर्धा सात वेळा जिंकली आहे. श्रीलंकेने पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे, तर पाकिस्तानने दोनदा विजेता संघ म्हणून उदयास आला आहे.