मुंबई : भारतातल्या सुरक्षेवर बोलणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना बीसीसीआयने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. १० वर्षानंतर पाकिस्तानमध्ये टेस्ट सीरिज खेळवण्यात आली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षेचा धोका आहे, असं मणी म्हणाले होते.
२००९ साली श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये टेस्ट सीरिज खेळवण्यात आली. श्रीलंकेची टीम पाकिस्तानमध्ये टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती.
एहसान मणी यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार बीसीसीआयने घेतला आहे. एहसान मणी यांनी पहिले स्वत:च्या देशातल्या सुरक्षेवर लक्ष द्यावं. आम्ही आमच्या देश सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम आहोत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे उपाध्यक्ष माहिम वर्मा यांनी दिली आहे.
बहुतेक काळ इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एहसान मणींनी भारतातल्या सुरक्षेविषयी बोलणं अयोग्य आहे. भारतच काय पाकिस्तानच्या सुरक्षेविषयी बोलायलाही एहसान मणी पात्र नाहीत. एहसान मणी पाकिस्तानमध्ये जास्त काळ थांबले, तर त्यांना तिकडची खरी परिस्थिती कळेल, अशी टीका बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमळ यांनी केली आहे.