विराट कोहलीवर मोठी कारवाई करणं टाळतंय BCCI?

कोहलीच्या विधानानंतर गांगुली यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Updated: Dec 17, 2021, 10:18 AM IST
विराट कोहलीवर मोठी कारवाई करणं टाळतंय BCCI? title=

मुंबई : एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. विराट कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे विधान खोटं ठरवलं. ज्यात गांगुली यांनी म्हटलं होतं की, मी विराट कोहलीला टी-20 चं कर्णधारपद सोडण्यास मनाई केली होती.

मात्र पत्रकार परिषदेत कोहलीने खुलासा केला की, त्याला टी-20 कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखलं नाही. कोहलीच्या या विधानानंतर गांगुली यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कोहलीवर कारवाई करणं टाळतंय BCCI

विराट कोहली टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण कोणतेही जाहीर वक्तव्य करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर बीसीसीआय या संकटाचा सामना करण्यासाठी पर्यायांचा विचार करतंय. मैदानाबाहेरील घडामोडींनी महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी संघाचे लक्ष विचलित होणार नाही याचीही बीसीसीआय काळजी घेईल.

गांगुली आणि कोहली यांच्यातील मतभेद

पत्रकार परिषदेदरम्यान विराटला टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्यास सांगितलं गेलं नसल्याचं म्हटलं. त्यांचं हे विधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या वक्तव्याच्या विरोधात होतं. जे त्याने प्रसारमाध्यमांमध्ये दिलं होतं. भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आणि सध्याचा कर्णधार आणि अध्यक्षपद भूषवणारे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याचं क्वचितच घडलंय.

BCCIला नुकसान नकोय

गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह वरिष्ठ बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी 'झूम कॉल' बैठक झाली. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "अध्यक्षांच्या कार्यालयाची प्रतिष्ठा असल्याने या संवेदनशील प्रकरणाला कसं सामोरं जावं याबद्दल तज्ञांनी मत जाणून घेतली." 

कसोटी मालिका होणार आहे याची बीसीसीआयला जाणीव आहे आणि त्यांनी घाईघाईने घेतलेला कोणताही निर्णय किंवा विधान संघाच्या मनोबलावर परिणाम करू शकते.