INDvsAUS:पहिल्या टेस्टसाठी १२ सदस्यीय भारतीय टीमची घोषणा

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Dec 5, 2018, 04:36 PM IST
INDvsAUS:पहिल्या टेस्टसाठी १२ सदस्यीय भारतीय टीमची घोषणा title=

ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. ४ टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट ऍडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट मॅचसाठी १२ सदस्यांच्या भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयनं ट्विटरवून खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली. या मॅचमध्ये विराट कोहलीसोबत मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी यांच्यावर बॅटिंगची जबाबदारी असेल. मुरली विजय आणि केएल राहुल ओपनिंग करतील हे जवळपास निश्चित आहे. दुखापत झाल्यामुळे पृथ्वी शॉ आधीच पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे बॅटिंगला येतील.

विकेट कीपर म्हणून भारतीय टीमनं पुन्हा एकदा ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे. तर रोहित शर्मा आणि हनुमा विहारीपैकी कोणाला संधी मिळणार का दोघंही खेळणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

भारतीय टीममध्ये किती बॉलर?

भारतीय टीम या मॅचमध्ये ४ बॉलर घेऊन खेळण्याची शक्यता आहे. जर उमेश यादव, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह भारताचे ३ फास्ट बॉलर आणि अश्विन स्पिनर असू शकतील. पाचवा बॉलर म्हणून विराटनं हनुमा विहारीचा विचार केला तर मात्र रोहितला बाहेर बसाव लागेल.

ऍडलेडमध्ये भारताचं खराब रेकॉर्ड

ऍडलेडच्या मैदानात भारतानं आत्तापर्यंत ११ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या एकाच टेस्ट मॅचमध्ये भारताला विजय मिळाला होता. १५ वर्षांपूर्वी राहुल द्रविडचं द्विशतक आणि अजित आगरकरच्या बॉलिंगमुळे या मैदानात भारत जिंकला होता. ऍडलेडमध्ये भारत ७ मॅच हारला आहे तर ३ मॅच ड्रॉ झाल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत ९४ टेस्ट मॅच झाल्या आहेत. यातल्या ४१ मॅच ऑस्ट्रेलियानं आणि २६ मॅच भारतानं जिंकल्या. भारतानं २६ पैकी ५ टेस्ट मॅच ऑस्ट्रेलियात तर उरलेल्या मॅच मायदेशात जिंकल्या.

भारतीय टीम

विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह