गांगुली येताच इतिहास घडणार! टीम इंडिया पहिली डे-नाईट टेस्ट खेळणार

सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्ष होताच भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

Updated: Oct 29, 2019, 07:20 PM IST
गांगुली येताच इतिहास घडणार! टीम इंडिया पहिली डे-नाईट टेस्ट खेळणार title=

मुंबई : सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्ष होताच भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बीसीसीआयने ठेवलेल्या डे-नाईट टेस्ट मॅचच्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबरपासून कोलकात्यात सुरू होणारी टेस्ट मॅच ही टीम इंडियाची पहिलीच डे-नाईट टेस्ट मॅच असेल. २८ ऑक्टोबरला बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला डे-नाईट टेस्ट मॅचचा प्रस्ताव पाठवला होता. बांगलादेश हा प्रस्ताव स्वीकारेल, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला होता.

सौरव गांगुली आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांच्यात या मुद्द्यावरून चर्चा झाली. यानंतर हसन यांनी बांगलादेशच्या खेळाडूंशी चर्चा केली. यानंतर डे-नाईट टेस्ट मॅचची घोषणा करण्यात आली आहे. डे-नाईट टेस्ट मॅच ही गुलाबी बॉलने खेळवण्यात येते. डे-नाईट टेस्ट मॅचची तयारी करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी गांगुली आग्रही होता.

अध्यक्ष झाल्यानंतर गांगुलीने मुंबईत कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माची भेट घेतली. या भेटीमध्ये डे-नाईट टेस्ट मॅचबद्दल चर्चा झाली होती. 'आम्ही सगळे डे-नाईट टेस्ट मॅचबद्दल विचार करत आहोत. माझा डे-नाईट टेस्ट मॅचवर विश्वास आहे. कोहलीनेही यासाठी समर्थन केलं आहे. विराट डे-नाईट टेस्टच्या विरोधात आहे, अशा काही बातम्या येत होत्या, पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. खेळाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि हाच पुढचा मार्ग आहे. लोकांनी काम संपवून चॅम्पियन खेळाडूंना पाहायला आलं पाहिजे. हे कधी होईल, मला माहिती नाही, पण हे नक्की होईल,' असं गांगुली म्हणाला होता.