भारताविरूद्ध आफ्रिदी खेळणार की नाही?, बाबर आझमने केला खुलासा

टी-20 विश्वचषकाआधी बाबर आझमने केलं मोठं वक्तव्य 

Updated: Oct 15, 2022, 11:42 PM IST
भारताविरूद्ध आफ्रिदी खेळणार की नाही?, बाबर आझमने केला खुलासा title=

T20 world cup 2022 : पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करेल आणि हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. T20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच, पाकिस्तानने T20 विश्वचषक 2021 मध्ये भारताचा पराभव केला. भारताने तो सामना पाकिस्तानकडून 10 गडी राखून गमावला होता. त्यावेळी पाकिस्तान संघाचा हुकमी एक्का असलेला वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी गेमचेंझर ठरला होता. (babar azam gave biggest update on shaheen afridi Sport marathi news)

शाहीन आफ्रिदीला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती आणि तो आशिया चषक 2022, इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका आणि न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेव्यतिरिक्त त्याच्या संघासाठी खेळू शकला नव्हता. भारताविरूद्धच्या सामन्यामध्ये शाहीन आफ्रीदी खेळणार की नाही यावर कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

शाहीन आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याचे शंभर टक्के देण्यास पूर्णपणे तयार असून आम्हाला त्याच्याकडून खूप आशा आहेत. तो नक्कीच चांगली कामगिरी करेल, असं बाबर आझमने सांगितलं आहे. आफ्रिदीसोबत फखर जमान संघातही परतल्याचं आझमन सांगितलं आहे. शाहीन आफ्रिदी भारताविरुद्ध मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहीनच्या आगमनाने पाकिस्तान संघाची गोलंदाजी मजबूत झाली आहे.

गेल्या T20 विश्वचषकात 22 वर्षीय शाहीन आफ्रिदीने भारतीय फलंदाज रोहित शर्माला शून्यावर, के.एल. राहुलला 3 धावांवर आणि विराट कोहलीला 57 धावांवर बाद करून भारताला मोठी धावसंख्या गाठण्यापासून रोखले होते. त्या सामन्यात त्याने 4 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले होते. शाहीनला सामनावीराचा किताब देण्यात आला. आता जर पाकिस्तानला भारताविरुद्ध चांगली कामगिरी करायची असेल, तर शाहीन आफ्रिदीची कामगिरी त्याच्या संघासाठी खूप महत्त्वाची असेल.