AUS vs AFG, Glenn Maxwell : मुंबईच्या वानखेडे मैदानात ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आलं अन् या वादळात अफगाणिस्तानचा संघ भूईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. आयुष्यभर लक्षात राहिल, अशी इनिंग मॅक्सवेल याने वर्ल्ड कपमध्ये खेळली. आयुष्यातली सर्वोत्तम खेळी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या उंभरठ्यातून बाहेर काढलं. 21 फोर आणि 10 सिक्स मारत त्याने आभाळ देखील ठेंगणं केलं. ना परिस्थितीशी हरला, ना दुखापतीने खचला. तो फक्त लढत राहिला, तेही अंतिम क्षणापर्यंत... इतिहासात उल्लेख करावा, अशी खेळी आज मॅक्सवेलने खेळली अन् अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला.
सामना हातातून गेलाच होता म्हणा... आऊट झाला असता तरी कोणी काही बोललं नसतं. मात्र, तो थांबला नाही. कशाचीच पर्वा न करता मैदानात उतरला अन् अफगाणी गोलंदाजांचा नंगा नाच पाहिला. थोडा थांबला अन् हाणामारी सुरू केली. समोर मग कोणीही असो, त्याला एवढंच माहिती की, बॉल टप्प्यात आला की फिरवायचा... कळत नकळत सेंच्यूरी झाली. पण सेंच्यूरीची पर्वा केली तर मॅक्सवेल कसला..! आपलं काम अजून झालं नाही, हे त्यांना नक्की माहित होतं. मांड्यांना वेदना झाल्या, कॅम्प्स आले, पण लढाई मध्येच सोडून जमणार नव्हती. सवंगड्याने साथ दिली. थोडा सावरला... वाघिणीचं दुध पिऊन पुन्हा आला अन् सारंच्या सारं जिंकून घेतलं. खऱ्या अर्थाने मॅक्सवेलने झुंजार खेळी केली.
ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याने नाबाद 201 धावांची शानदार खेळी केली. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 292 धावांचे लक्ष्य दिले होते. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित मानला जात होता पण मॅक्सवेलने आपल्या स्फोटक खेळीच्या जोरावर विजयापर्यंत नेलं अन् ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं आहे. मॅक्सवेलने या सामन्यात 128 बॉलमध्ये 201 धावांची वादळी खेळी केली. त्यात 21 फोर अन् 10 गगनचुंबी सिक्स...
अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यातील 22 वी ओव्हर नीर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलला मॅक्सवेलकडून कॅच उडाला. मात्र, झेल पकडताना मुजीबची मोठी चूक झाली आणि त्याला हा झेल पकडता आला नाही. त्यामुळे मॅक्सवेलला यावेळी 33 धावांवर असताना जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. हा कॅच सुटल्यानंतर मॅक्सवेल एक वेगळ्याचं अंदाजात पहायला मिळाला. आऊट तर व्हायचंच आहे तर मारून आऊट होऊ असा विचार त्याने केला असावा. मात्र, मॅक्सवेलने आज 'बाप' खेळी केलीये, एवढं नक्की!