क्रिकेटमध्ये एका चेंडूत 1, 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त 6 धावा काढू शकतो. पण एकाच चेंडूवर 7 धावा मिळणं हे फार दुर्मिळ आहे. म्हणजे गोलंदाजाने नो बॉल टाकला असेल आणि त्यावर फलंदाजाने षटकार ठोकला असेल तर 7 धावा मिळू शकतात. पण नो बॉल नसतानाही ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉने एका चेंडूत 7 धावा मिळवत थेट अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानविरोधातील सराव कसोटी सामन्यात हा प्रकार घडला.
ऑस्ट्रेलियाचा प्राइम मिनिस्टर XI आणि पाकिस्तान यांच्यात हा सराव कसोटी सामना सुरु होता. यावेळी मॅट रेनशॉने अर्धशतक पूर्ण करतानाच अशक्य अशी गोष्ट करुन दाखवली. त्याने एका चेंडूत एकूण 7 धावा मिळवल्या आणि सोबत 50 धावाही पूर्ण केल्या. पण यामागे मॅट रेनशॉचं कौशल्य नव्हे तर पूर्णपणे नशिबाची साथ होती.
झालं असं की, पाकिस्तानचा अबरार अहमद गोलंदाजी करत होता. 78 ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मॅट रेनशॉने डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू टोलवला. चेंडू सीमापार जाण्यापासून रोखण्यासाठी मिर हमजाने धाव घेतली. चेंडू सीमापार जाण्याच्या काही क्षण आधीच हमजाने चेंडू रोखला. पण त्यानंतर जे झालं त्याचा कोणीही विचार केला नव्हता. हमजाने चेंडू नॉन-स्ट्रायकर एंडच्या दिशेने फेकला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने हा चेंडू पकडला.
You don't see this every day! Matthew Renshaw brings up his half-century ... with a seven! #PMXIvPAK pic.twitter.com/0Fx1Va00ZE
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2023
यादरम्यान मॅट रेनशॉने 3 धावा धावून काढल्या होत्या. पण बाबरने विकेट किपरच्या दिशने फेकलेला चेंडू स्टम्पवर लागला नाही. विकेटकिपरही तो चेंडू पकडू शकला नाही आणि थेट चौकार गेला. या सगळ्यात मॅट रेनशॉला अतिरिक्त 4, म्हणजेच एकूण 7 धावा मिळाल्या. यासह त्याने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरची जागा मॅट रेनशॉ घेण्याची शक्यता आहे. सध्या त्याचं पारडं जड दिसत आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा रेनशॉला मिळू शकते. सध्या असंही वॉर्नरला संघात स्थान देण्यावरुन वाद सुरु आहे.
पाकिस्तान मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात वॉर्नरची निवड हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: ऑस्ट्रिलेयाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने या प्रकरणावर त्याला आणि निवडकर्त्यांना प्रश्न विचारल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.