ऍडलेड : ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये वॉर्नरने नाबाद ३३५ रनची खेळी केली. यामध्ये ३९ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. ४१८ बॉलमध्ये वॉर्नरने ३३५ रनचा डोंगर उभारला. टेस्ट क्रिकेटमधला ऑस्ट्रेलियाकडून हा दुसरा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे. याआधी ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू हेडनने २००३ साली झिम्बाब्वेविरुद्ध ३८० रन केले होते. सर डॉन ब्रॅडमन आणि मार्क टेलर यांनी प्रत्येकी ३३४ रनची खेळी केली होती. ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध १९३० साली आणि मार्क टेलर यांनी १९९८ साली पाकिस्तानविरुद्ध ३३४ रन केले होते.
टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक स्कोअर करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वॉर्नर १०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्रायन लाराने इंग्लंडविरुद्ध २००४ साली केलेला ४०० रनचा विक्रम अजूनही कायम आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये वॉर्नरला लाराचा विक्रम मोडण्याची संधी होती, पण कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाचा डाव ५८९/३ वर घोषित केला. मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा अर्धाच खेळ झाला असताना टीम पेनने डाव घोषित केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन झालं होतं. यानंतर वर्ल्ड कपच्या टीममध्ये वॉर्नरने पुनरामन केलं होतं. वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरची बॅट चांगलीच तळपली होती. वॉर्नरने वर्ल्ड कपमध्ये ६४७ रन केल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर होता. रोहित शर्मा या वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता. रोहितने वॉर्नरपेक्षा १ रन जास्त म्हणजेच ६४८ रन केले होते. यानंतर झालेल्या ऍशेसमध्ये मात्र वॉर्नरच्या पदरी निराशा आली. आता मात्र पुन्हा एकदा वॉर्नरने स्वत:ला सिद्ध केलं आहे.