नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम वनडे रँकिंगमध्ये गेल्या 34 वर्षातील सर्वात खालच्या स्थानी पोहोचली आहे. सोमवारी आयसीसीने रँकिंग घोषणा केल्यानंतर 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणारी ऑस्ट्रेलिया टीम सहाव्या स्थानी पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये पुन्हा पाचव्या स्थानी येण्यासाठी बाकी 3 पैकी कमीत कमी एक मॅच जिंकावी लागेल.
ऑस्ट्रेलिया टीम 1984 मध्ये सहाव्या स्थानी होती. मागील 2 वर्षात खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या स्थानावरुन सहाव्या स्थानी घसरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या 0-5 ने पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या खराब स्थितीला सुरुवात झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 15 वनडे सामन्यांपैकी 13 सामने गमवले. न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंड यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुरुवातीलाच बाहेर झाल्याने ऑस्ट्रेलियाला सहाव्या स्थानी यावं लागलं आहे.
पहिल्या स्थानी इंग्लंड, दुसऱ्या स्थानी भारत आणि तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका वनडे रँकिंगमध्ये कायम आहेत.