मुंबई : पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी धूळ चारल्यानंतर टी-२० मालिकेत विजयी परंपरा कायम राखण्यासाठी भारत सज्ज झालाय.या दोन्ही संघादरम्यान तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेत भारताचे पारडे जड दिसतेय.
या दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत १३ टी-२० सामने खेळवण्यात आलेत. ज्यात भारताने ९ सामन्यांमध्ये विजय मिळवलाय तर ४ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला. टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला टी-२० या शॉर्ट फॉरमॅटमध्ये मात्र तितकीशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये.
टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने २०१२मध्ये सगळ्यात शेवटचा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने २०१२मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये २८ सप्टेंबरला कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात भारतावर ९ विकेट राखून विजय मिळवला होता. या सामन्यातील दोन्ही संघातील तीन क्रिकेटर रांचीमध्ये होणाऱ्या सामन्यात दिसणार आहेत. भारताचे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा तर ऑस्ट्रेलियाचे डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि डेन ख्रिस्टियन या सामन्यात खेळणार आहेत.
या टी-२० मालिकेत भारताचे पारडे जड आहे. भारत सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. दुसरीकडे पाच वनडे सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाला एकाच सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे टी -२० मालिकेतही भारत ही विजयी परंपरा कायम राखणार का? अन्यथा ऑस्ट्रेलिया वनडेेतील पराभवाचा बदला टी-२० मालिकेत घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिला सामना उद्या म्हणजेच ७ ऑक्टोबरला, दुसरा सामना १० ऑक्टोबरला आणि तिसरा सामना १३ ऑक्टोबरला होतोय.