भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये दोन बदल

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी आणि शेवटची वनडे शुक्रवार १८ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

Updated: Jan 17, 2019, 06:05 PM IST
भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये दोन बदल title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी आणि शेवटची वनडे शुक्रवार १८ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या मॅचसाठी ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीममध्ये २ बदल केले आहेत. शेवटच्या मॅचसाठी ऑफ स्पिनर नॅथन लायनला विश्रांती देण्यात आली आहे. तर फास्ट बॉलर जेसन बेहरेनड्रॉफला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही. नॅथन लायनच्याऐवजी स्पिनर ऍडम झम्पा आणि बेहरेनड्रॉफऐवजी बिली स्टॅनलेकला खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाची टीम

एरॉन फिंच, एलेक्स कारे, उस्मान ख्वाजा, शॉन मार्स, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, मार्कस स्टॉयनीस, ग्लेन मॅक्सवेल, जे रिचर्डसन, पीटर सी़डल, ऍडम झम्पा, बिली स्टॅनलेक

भारतीय टीममध्येही बदल होणार?

ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतीय टीममध्येही बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडेमध्ये भारतानं खलील अहमदला खेळवलं होतं, तर दुसऱ्या वनडेमध्ये खलीलऐवजी मोहम्मद सीराजला संधी देण्यात आली होती. पण या दोन्ही बॉलरनी मॅचमध्ये जास्त रन दिल्या. त्यामुळे तिसऱ्या मॅचमध्ये विराट कोहलीकडे केदार जाधव किंवा विजय शंकर यांच्यापैकी एका ऑल राऊंडरला खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. भारताची बॉलिंग आणखी मजबूत करायची असेल तर विराट आणखी एका ऑलराऊंडरला खेळवण्याऐवजी लेग स्पिनर युझवेंद्र चहललाही संधी देऊ शकतो. चहलला संधी मिळाली तर भारत कुलदीप, चहल आणि जडेजा असे ३ स्पिनर घेऊन मैदानात दिसेल.

३ वनडे मॅचच्या सीरिजमधली पहिली वनडे ऑस्ट्रेलियानं ३४ रननी जिंकली. तर दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं आणि ६ विकेटनं विजय मिळवला. त्यामुळे सीरिज सध्या १-१नं बरोबरीत आहे. तिसऱ्या वनडेमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम वनडे सीरिज खिशात टाकेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली ३ टी-२० मॅचची सीरिज १-१नं बरोबरीत सुटली, कारण एक टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली होती. तर ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला होता. आता वनडे सीरिजवरही कब्जा करण्याची संधी भारतीय टीमला आहे. याआधी ऑस्ट्रेलियात भारताला एकदाही द्विदेशीय वनडे सीरिज जिंकता आलेली नाही.