2023 ODI World Cup Final: "ODI वर्ल्डकप फायनलमध्ये भारत 65 वर All Out होईल"; दिल्लीच्या खेळाडूचं विधान

India Will Be All Out On 65 In 2023 ODI World Cup Final: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा भारतामध्ये खेळवली जाणार असून यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 11, 2023, 03:37 PM IST
2023 ODI World Cup Final: "ODI वर्ल्डकप फायनलमध्ये भारत 65 वर All Out होईल"; दिल्लीच्या खेळाडूचं विधान title=
India All Out

2023 ODI World Cup Final: सध्या इंडियन प्रिमिअर लिग सुरु आहे. स्पर्धेतील अर्ध्याहून अधिक सामने संपले असले तरी स्पर्धेतील चूरस मात्र कायम आहे. असं असलं तरी दुसरीकडे या वर्षाच्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडत असलेल्या आयसीसीच्या एकदिवसीय वर्ल्डकप (2023 ODI World Cup) स्पर्धेबद्दलची चर्चाही सुरु झाली आहे. भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. भारताला मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली होती ही शेवटची स्पर्धा होती. त्यामुळेच आता 10 वर्षांचा हा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशानेच रोहित अॅण्ड कंपनी मैदानात उतरेल. एकीकडे भारतीय संघामध्ये कोणाला संधी मिळेल आणि कोणाला नाही यासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं असतानाच दिल्ली कॅपिटल्सच्या संघामधील एका क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपबद्दल भविष्यवाणी केली आहे. विशेष म्हणजे भारतीय चाहत्यांना ही भविष्यवाणी फारशी आवडणार नाही अशीच आहे.

नेमकं कोण आणि काय म्हणालं?

2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या दमदार दावेदारांमध्ये भारताबरोबरच सध्याचे विजेता इंग्लंडचा संघ, न्यूझीलंडचा संघ आणि ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या एका वृत्तानुसार 2023 ची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबर रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने वर्ल्डकप स्पर्धेबद्दलची भविष्यवाणी केली आहे. मिचेल मार्शने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्व दमदार खेळाडू संघात असतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या मार्श दिल्लीच्या संघाकडून खेळत आहे. 

एका मुलाखतीमध्ये त्याला वर्ल्डकप स्पर्धेबद्दलची भविष्यवाणी करण्यास सांगितलं असता मार्शने एक आश्चर्यकारक विधान करत सर्वांनाच धक्का दिला. दिल्ली कॅपिटल्सच्या एका पॉडकास्टदरम्यान मार्शने हे विधान केलं. हसतच या ऑस्ट्रेलियन खेळाडूने "भारताला पराभूत करुन ऑस्ट्रेलियन संघ विजेता होईल. अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 450 असेल आणि भारतीय संघ 65 धावांवर तंबूत परतेल," असं म्हटलं आहे. 

कधी खेळवली जाणार स्पर्धा?

वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने भारतातील एकूण 12 मैदानांची यादी तयार केली आहे. यामध्ये बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई, धर्मशाला, हैदराबाद, गुवहाटी, कोलकाता, लखनऊ, इंदूर, राजकोट, कोलकातामधील मैदानांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ खेळणार असून ही स्पर्धा 46 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. एका वृत्तानुसार या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाण्याची शक्यात आहे. मात्र वेळापत्रकाबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वर्ल्डकप फायनलचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.