'आधी तुझ्या हातावरचा बँड काढ', इमाम-उल-हकने रोखलं; बुमराहने पुढच्याच चेंडूवर केलं असं काही; पाहा VIDEO

आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने तब्बल 228 धावांनी हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यातील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Sep 12, 2023, 10:35 AM IST
'आधी तुझ्या हातावरचा बँड काढ', इमाम-उल-हकने रोखलं; बुमराहने पुढच्याच चेंडूवर केलं असं काही; पाहा VIDEO title=

पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर सोमवारी आशिया कपमध्ये अखेर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडले. पण या सामन्यात भारताने एकहाती वर्चस्व राखत पाकिस्तानचा दारुण पराभव केला. पावसाने व्यत्यय आणल्याने आरक्षित दिवशी हा सामना खेळवण्यात आला असता, भारताने पाकिस्तानसमोर 356 धावांचा डोंगर उभा केला होता. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने केलेली जबरदस्त सुरुवात आणि त्यानंतर के एल राहुल आणि विराट कोहलीने शतकं झळकावर भारतीय फलंदाजीची चुणूक दाखवून दिली. 357 धावांचं लक्ष्य गाठतना पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरश: गुडघे टेकले. 

दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या सामन्यातील अनेक क्षण हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. यामधील एक क्षण असा होता, जेव्हा पाकिस्तानी फलंदाज इमाम-उल-हकने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला त्याच्या कोपरावरील पट्टी (elbow straps)  काढण्याची विनंती केली. फलंदाजी करताना विचलित होत असल्याने त्याने ही पट्टी काढण्यास सांगितलं. 

सर्वात वेगवान 13 हजार धावांचा बादशहा बनला कोहली; पाकविरुद्ध ठोकलं 47 वं शतक; सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

 

बुमरहानेही इमाम-उल-हकच्या विनंतीनंतर पट्टी काढून मैदानातील पंचांकडे दिली. पण यानंतर टाकलेल्या पुढच्याच चेंडूवर बुमरहाने इमाम-उल-हकची विकेट घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रोहित शर्मानेही जर टॉस जिंकलो असतो तर फलंदाजीच घेतली असती असं सांगितलं होतं. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनीही अर्धशतक ठोकत शतकी भागीदारी केली होती. रोहित शर्मा 56 आणि शुभमन गिल 58 धावांवर बाद झाला. 

यानंतर के एल राहुल आणि विराट कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी केली. के एल राहुलने 111 आणि विराटने 122 धावा ठोकल्या. पाकिस्तानसमोर भारताने 357 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 

पाकिस्तानी फलंदाज मैदानात उतल्यानंतर संघर्ष करताना दिसले. खासकरुन जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पाकिस्तानी फलंदाज काहीसे चाचपडताना दिसले. बुमराहचा वेग, स्विंग यामुळे पाकिस्तानी फलंदाज नीट खेळू शकले नाहीत. यादरम्यान, 18 धावांवर असताना बुमरहाने इमामला बाद केलं. यानंतर हार्दिक पांड्याने बाबर आझमचा त्रिफळा उडवला. यानंतर पावसाने व्यत्यय आणला होता. पण नंतर सामना सुरु झाल्यानंतर कुलदीप यादवच्या फिरकीची जादू चालली. त्याने 5 विकेट्स मिळवले. पाकिस्तान संघ 128 वर सर्वबाद झाला आणि भारताने 228 धावांनी सामना जिंकत इतिहास रचला.