दुबई : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानला मात दिल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) सामना आता हॉंगकॉंग विरूद्ध होणार आहे. हा सामना उद्या 31 ऑगस्टला रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. या सामन्यासाठी दुसऱ्या खेळाडूंना देखील संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे, ते जाणून घेऊयात.
येत्या 31 ऑगस्टला भारतीय संघ हाँगकाँगशी भिडणार आहे. टीम इंडिया (Team India) जर हा सामना जिंकतो, तर तो सुपर 4 साठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना हलक्यात घेऊ शकत नाही. त्यामुळे या सामन्याकडे आता क्रिकेट फॅन्सच्या नजरा लागल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्मा खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या अनेक स्टार खेळाडूंना तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. त्याचबरोबर टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत देखील बदल करण्यात येणार आहेत.
केएल राहुल आणि रोहित शर्मा भारतासाठी सलामीला जाऊ शकतात. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात केएल राहुल खाते न उघडताच बाद झाला होता. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माही देखील आपल्या जुन्या लयीत दिसला नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे उतरणे निश्चित दिसते. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध चांगली सुरुवात केली होती, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. अशा स्थितीत हाँगकाँगविरुद्ध समान्य़ात तो फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता आहे.
रवींद्र जडेजाला पाकिस्तानविरुद्ध चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले. अशा स्थितीत कर्णधार त्याला फलंदाजीच्या क्रमात लेफ्ट-राइट कॉम्बिनेशन करण्याची संधी चौथ्या क्रमांकावर देऊ शकतो. सूर्यकुमार यादवला पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी खेळता आली नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या जागी दीपक हुड्डाला संधी दिली जाऊ शकते.
तसेच दिनेश कार्तिककडे पुन्हा विकेटकिपिंगची जबाबदारी येऊ शकते. त्यामुळे या सामन्यातही रिषभ पंतला बाहेर बसवले जाईल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरलेल्या हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळू शकते.
बॉलर्समध्ये 'या' खेळाडूला संधी
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) सर्व बॉलर्सने शानदार खेळ दाखवला. भुवनेश्वर कुमारने चांगली बॉलिंग करत चार विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनीही शानदार गोलंदाजी केली. आवेश खानला खास कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आवेश खानऐवजी स्टार फिरकी रविचंद्रन अश्विनला संधी देऊ शकतो.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल.