मोहाली : यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या शानदार फॉर्ममुळे पंजाबच्या टीमचं प्रदर्शन चांगलं होत आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबनं ७ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत तर २ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. हैदराबादविरुद्धच्या मागच्या मॅचमध्ये पंजाबला पराभवाला सामोरं जावं लागलं. या मॅचमध्ये पंजाबनं युवराज सिंगला टीममधून काढलं. युवराजऐवजी मनोज तिवारीला संधी देण्यात आली पण त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. पंजाबच्या टीमचं नेतृत्व आर.अश्विनकडे आहे. या मॅचनंतर युवराजला डच्चू देण्याबाबत अश्विनला विचारण्यात आलं. युवराजबद्दलच्या या प्रश्नावर अश्विनचा पारा चढला.
मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अश्विन भडकला. युवराजबद्दल काय अपडेट आहे? असा सवाल पत्रकारानं अश्विनला विचारला. काय अपडेट? मी आधीच स्पष्ट केलं आहे की युवराज सिंगला या मॅचमध्ये घेण्यात आलेलं नाही, असं अश्विन म्हणाला.
या आयपीएलमध्ये युवराज सिंगला कमाल दाखवता आलेली नाही. फिटनेस आणि फॉर्म ही युवराजची समस्या बनलेली आहे. म्हणून युवराजला हैदराबादविरुद्धच्या मॅचमधून वगळण्यात आलं होतं.