अंडर १९ वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या पृथ्वी शॉचा आणखी एक रेकॉर्ड

भारताला अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या पृथ्वी शॉनं आयपीएलमध्येही शानदार रेकॉर्ड केलं आहे.

Updated: Apr 29, 2018, 06:26 PM IST
अंडर १९ वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या पृथ्वी शॉचा आणखी एक रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : भारताला अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या पृथ्वी शॉनं आयपीएलमध्येही शानदार रेकॉर्ड केलं आहे. आयपीएलमध्ये सगळ्यात लहान वयात अर्धशतक बनवण्याच्या रेकॉर्डशी शॉनं बरोबरी केली आहे. संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ हे आयपीएलमध्ये सर्वात लहान वयात अर्धशतक करणारे खेळाडू आहेत. पृथ्वी शॉची आयपीएलमधली ही दुसरीच मॅच होती. पृथ्वी शॉनं आयपीएलच्या २ मॅचमध्ये ८४ रन बनवल्या आहेत. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉनं ४४ बॉलमध्ये ७ फोर आणि २ सिक्सच्या मदतीनं ६२ रन केल्या.

दिल्लीनं शॉला विकत घेतलं

यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये दिल्लीनं पृथ्वी शॉला विकत घेतलं. आयपीएल लिलावामध्ये शॉची बेस प्राईज २० लाख रुपये एवढी होती पण दिल्लीनं शॉला टीममध्ये घेण्यासाठी १.२० कोटी रुपये मोजले.

अंडर १९मध्येही शॉचं रेकॉर्ड

पृथ्वी शॉ अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा सर्वात लहान वयातला कर्णधार आहे. पृथ्वी शॉनं १८ वर्ष ८६ दिवसांचा असताना अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला. अंडर १९ वनडे टीमचा कर्णधार म्हणून १०० टक्के विजय मिळवण्याच्या रेकॉर्डशीही शॉनं बरोबरी केली आहे. पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीनं ११ पैकी ११ मॅच जिंकल्या आहेत.

रणजीमध्येही शानदार प्रदर्शन

पृथ्वी शॉची तुलना ही नेहमीच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी होते. मागच्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळताना पृथ्वी शॉ हा १८ वर्षांच्या वयामध्ये सर्वाधिक शतक लगावणारा बॅट्समन बनला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये शॉ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पृथ्वी शॉच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर आहे. सचिननं या वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७ शतकं लगावली आहेत.