मुंबई : भारतीय टीममधून बाहेर झाल्यामुळे करुण नायर आणि मुरली विजय यांनी निवड समितीच्या संवाद नितीवर प्रश्न उपस्थित केले होते. यावरून आता या दोन्ही खेळाडूंची अडचण होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय करुण नायर आणि मुरली विजयकडून स्पष्टीकरण मागू शकतं. विजय आणि नायर यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. निवड समिती आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना या दोघांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया फारशी रुचलेली नाही.
विजय आणि करुण यांनी निवड समितीवर प्रतिक्रिया देऊन चांगलं केलं नाही. हे नियमांचं उल्लंघन आहे. नियमानुसार कोणताही खेळाडू नुकत्याच संपलेल्या दौऱ्याच्या 30 दिवसांपर्यंत काहीही बोलू शकत नाही. हैदराबादमघ्ये 11 ऑक्टोबरला होणाऱ्या सीओएच्या बैठकीत हा मुद्दा उचलला जाऊ शकतो, असं वक्तव्य बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं केलं आहे.
करुण नायर आणि मुरली विजयनं निवड समितीवर संवाद न साधल्याचा आरोप केला होता. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी या आरोपांचं खंडन केलं होतं.
करुण नायरला इंग्लंडमध्ये पाचपैकी एकाही टेस्ट मॅचमध्ये संधी देण्यात आली नव्हती. तर मुरली विजयला पहिल्या तीन टेस्ट मॅचनंतर डच्चू देण्यात आला होता. यानंतर मुरली विजय एसेक्सकडून काऊंटीच्या तीन मॅच खेळला.
करुण नायरपेक्षा अनुभवी मुरली विजयनं केलेल्या वक्तव्यामुळे बीसीसीआय जास्त नाराज झालं आहे. जर मुरली विजयला सांगितलं नसतं तर तो एसेक्सकडून काऊंटी क्रिकेट खेळला नसता. मुरली विजय खरं सांगत नाहीये, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनं दिली आहे.
इंग्लंड दौऱ्यातल्या पाचही टेस्टमध्ये करुण नायरला संधी मिळाली नाही. शेवटच्या टेस्टमध्ये तर करुण नायरऐवजी हनुमा विहारीला टीममध्ये स्थान मिळालं. इंग्लंड दौऱ्यानंतर करुण नायरनं क्रिकबझला मुलाखत दिली. कोणत्याही व्यक्तीला हे सहन करणं कठीण आहे. एक व्यक्ती अशा स्थितीला सांभाळू शकत नाही. टीम व्यवस्थापन आणि इतरांनी हा निर्णय घेतला, त्यामुळे मला हे स्विकारावं लागलं. मी यामध्ये काहीही करू शकत नाही. पण मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी बॅटनंच उत्तर देईन, असं नायर म्हणाला.
मुरली विजयनं निवड समितीवर निशाणा साधला. टीममधून डच्चू मिळाल्यानंतर टीम व्यवस्थानानं माझ्याशी चर्चाही केली नाही. टीममधून बाहेर काढतानाही माझ्यासोबत चर्चा झाली नाही. निवड समिती अध्यक्ष किंवा टीमशी जोडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीनं माझ्याशी संवाद साधला नाही, असं वक्तव्य मुरली विजयनं मुंबई मिररशी बोलताना केलं.