मुंबई : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे. तिथल्या हॉटेलच्या रूममधून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विराटचा बेड आणि सामान दाखवण्यात आले आहे. विराटच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) संताप व्यक्त केला आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं असं करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अनुष्काने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर करत लिहिले की, 'याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत जेव्हा चाहत्यांना आमच्यावर दया आली नाही पण ही सर्वात वाईट गोष्ट होती. अतिशय घृणास्पद आणि मानवतेचे उल्लंघन आहे. जो कोणी हे पाहतो आणि विचार करतो की जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर तुम्हाला हे डील करावं लागेल, तुम्ही देखील या समस्येचा एक भाग आहात हे समजलं पाहिजे. थोडासा आत्मसंयम ठेवल्यास सर्वांना मदत होते. तसेच तुमच्या बेडरूममध्ये हे घडू शकते तेव्हा मर्यादा कुठे आहे?'
अनेक पापाराझींनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. विराटचे चाहते संतापले आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, 'नक्कीच मॅनेजरची नोकरी जाणार.' नेटकऱ्यांनी याला एक वाईट कृत्य म्हटले आहे. (anushka sharma lashesh out people who leaked virat kohli hotel room video in australia)
विराटनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विराटचे बूट, चष्मा, कपडे दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत विराटने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसेच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे.'
'माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी. कोणाच्याही खासगी आयुष्यात आक्रमण करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही,’ असे म्हणत विराटने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. त्यांच्या खासगी आयुष्याला मनोरंजनासाठी वापर करू नका, असे आवाहनही त्याने केले आहे.'