फारुख इंजिनियर यांच्या आरोपानंतर अनुष्का शर्मा संतापली

भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी केलेल्या टीकेवर अनुष्का शर्मा चांगलीच संतापली आहे.

Updated: Oct 31, 2019, 06:27 PM IST
फारुख इंजिनियर यांच्या आरोपानंतर अनुष्का शर्मा संतापली title=

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी केलेल्या टीकेवर अनुष्का शर्मा चांगलीच संतापली आहे. वर्ल्ड कपदरम्यान भारताच्या निवड समिती सदस्याने अनुष्का शर्माला चहा आणून दिला, असा खळबळजनक आरोप फारूख इंजिनियर यांनी केला. फारुख इंजिनियर यांचे हे आरोप अनुष्का शर्माने फेटाळून लावले आहेत.

'ही निवड समिती ही मिकी माऊस सिलेक्शन कमिटी आहे. टीम निवड हे काही आव्हान नाही, कारण टीम विराट कोहलीच चालवतो. निवड समितीची योग्यता काय आहे? सगळ्यांनी मिळून १०-१२ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. वर्ल्ड कपदरम्यान मी एका निवड समिती सदस्याला ओळखूही शकलो नाही. भारतीय ब्लेझर घालणारा हा कोण आहे? असं मी विचारलं तेव्हा हा निवड समिती सदस्य असल्याचं उत्तर मला मिळालं. हा सदस्य अनुष्का शर्माच्या बाजूला होता आणि तिला चहाचा कप देत होता,' असं फारुख इंजिनियर म्हणाले.

निवड समितीवर याआधी संदीप पाटील, श्रीकांत आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे खेळाडू होते. या तिन्ही खेळाडूंनी भारताला १९८३ सालचा वर्ल्ड कप जिंकवून दिला. दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे खेळाडू निवड समितीमध्ये असले पाहिजेत.

फारुख इंजिनियर यांनी केलेल्या या आरोपांनतर अनुष्का शर्मा चांगलीच भडकली आहे. ट्विटरवर अनुष्काने एक पोस्ट करून या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

अनुष्का शर्माचं स्पष्टीकरण

चुकीच्या आणि खोट्या बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचं माझं मत आहे. मागच्या ११ वर्षांमध्येही मी असंच वागले. पण अनेकवेळा एकच खोटी गोष्ट सांगितल्यानंतर ती खरी वाटायला लागते.

माझा तेव्हाचा बॉयफ्रेंड आणि आताचा नवरा विराटच्या कामगिरीबद्दल मला लक्ष्य करण्यात आलं, तेव्हाही मी शांत राहिले. टीम इंडियाच्या बंद दाराआडच्या बैठकींमध्ये माझा समावेश असतो. टीम निवडीमध्येही मी प्रभाव टाकते. परदेश दौऱ्यामध्ये विराटसोबत मी नियमांपेक्षा जास्तवेळ राहते, अशा खोट्या बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या. पण हे सगळं बोलण्याआधी सत्य तपासून घेतलं पाहिजे. मी कधीही कोणताच प्रोटोकॉल मोडला नाही.

माझं तिकीट आणि सुरक्षेसाठी बोर्डाला चिंता असल्याच्या खोट्या बातम्या देण्यात आल्या. पण मी स्वत:च्या पैशात मॅचची तिकीटं आणि विमानाची तिकीटं विकत घेतली. टीम इंडिया उच्चायुक्तांच्या घरी गेली तेव्हा मला ग्रुप फोटोमध्ये उभं राहण्यासाठी आग्रह करण्यात आला. सुरुवातीला मी नकार दिला होता. मला याचं आमंत्रण होतं, तरीही यावरून मोठा वाद निर्माण झाला.

आता वर्ल्ड कपमध्ये मला निवड समिती सदस्यांनी चहा दिल्याचं खोटं वृत्त देण्यात आलं आहे. पण वर्ल्ड कपमध्ये मी फक्त एक मॅच बघण्यासाठी आले होते. ही मॅचदेखील मी सिलेक्टर्स बॉक्समध्ये न बसता फॅमिली बॉक्समध्ये बसून बघितली.

निवड समितीबाबत आणि त्यांच्या पात्रतेबाबत तुम्ही मत मांडा, पण खळबळ उडवून देण्यासाठी यामध्ये माझं नाव विनाकारण आणू नका.

एखादा शांत राहतो म्हणजो तो कमकूवत आहे, असा त्याचा अर्थ नाही, म्हणून मी हे स्पष्टीकरण दिलं आहे. माझा नवरा किंवा बोर्डावर टीका करताना पुरावे आणि सत्य समोर ठेवा. मी माझं आयुष्य आणि कारकिर्दीची प्रतिष्ठा ठेवली आहे. यामध्ये मी कोणतीही तडजोड करणार नाही. आणि मी कॉफी पिते.