अनिल कुंबळेंच्या 'त्या' प्रथेला द्रविड-रोहितकडून पुन्हा सुरुवात

राहुल द्रविडने पुन्हा एकदा प्रथेला सुरुवात केली असल्याचं गावस्कर यांन म्हटलंय.

Updated: Nov 20, 2021, 03:45 PM IST
अनिल कुंबळेंच्या 'त्या' प्रथेला द्रविड-रोहितकडून पुन्हा सुरुवात title=

रांची : टीम इंडियाने शुक्रवारी रांचीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी-20 सामना खेळला. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असून आता तिसरा सामना कोलकात्यामध्ये होणार आहे. रांची T-20 मध्ये IPL मधून सर्वांच्या नजरेत आलेल्या हर्षल पटेलने पदार्पण केलं आणि सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांच्याकडून त्याला टीम इंडियाची कॅप देण्यात आली.

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. सामन्यातील कॉमेंट्रीदरम्यान सुनील गावसकर म्हणाले, "राहुल द्रविडने पुन्हा एकदा प्रथेला सुरुवात केली आहे. जिथे माजी भारतीय क्रिकेटर पदार्पण करणाऱ्या खेळाडूला टीम इंडियाची कॅप देतो."

माजी क्रिकेटपटू गावसकर म्हणाले, "अनिल कुंबळेने ही गोष्ट सुरू केली. जेव्हा-जेव्हा माजी खेळाडू मैदानावर उपस्थित असायचा तेव्हा तो त्याच्याकडून कॅप घ्यायचा. कोहली-शास्त्रींच्या काळात ही गोष्ट थांबली होती. पण आता राहुल द्रविडने ती पुन्हा सुरू केली आहे."

या मालिकेत दोन सामने खेळले गेले असून दोन्ही सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. व्यंकटेश अय्यरने जयपूर T-20 मध्ये पदार्पण केलं. हर्षल पटेलने रांचीमध्ये पदार्पण केलं. आणि दोघांनीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती.