'तू कोणतीही गाडी निवड...'; पायाने सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिद्रांचे खास गिफ्ट!

Anand Mahindra : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. आनंद महिंद्रा यांनी आता शीतल देवीच्या नेमबाजीची  प्रशंसा केली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 29, 2023, 02:41 PM IST
'तू कोणतीही गाडी निवड...'; पायाने सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिद्रांचे खास गिफ्ट! title=

Para Asian Games: ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आजूबाजूला घडणाऱ्या व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींवर ते भाष्य करत असतात. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेले व्हिडीओदेखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. आता त्यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या एका खेळाडूसाठी मोठं गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) हिला आनंद महिंद्रा यांनी खास भेट देण्याची घोषणा केली आहे. शीतल देवीच्या सुवर्णपदकामुळे आनंदीत झालेल्या आनंद महिंद्रा यांनी ही घोषणा केली आहे.

आनंद महिंद्रा यांना व्यवसायसह खेळांमध्ये खूप रस आहे. भारतीय खेळांडून ते नेहमीच प्रोत्साहीत करत असतात. सोशल मीडियावरही त्यांचे नेहमीच तोंडभरुन कौतुक देखील करतात. आता आनंद महिंद्रा यांनी शीतल देवीच्या प्रराक्रमाचं कौतुक केलं आहे. दोन्ही हात नसणाऱ्या शीतल देवीने आशियाई पॅरा गेम्समध्ये पाय, दात आणि खांद्यांच्या मदतीने तीन पदकं पटकावली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदके आहेत. यामुळे उत्साहित झालेल्या आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मोठी घोषणा केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये तिरंदाज शीतल देवीचा व्हिडिओ शेअर केला आहे. "आता मी माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांबद्दल कधीही तक्रार करणार नाही. शीतलदेवी, तू आम्हा सर्वांसाठी शिक्षिका आहेस. कृपया तू आमच्या श्रेणीतील तुझ्या आवडीची कोणतीही कार निवड. ती कार तुझ्या सोईनुसार कस्टमाईज केली जाईल आणि तुला भेट दिली जाईल," असे आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे

नेहमीप्रमाणे आनंद महिंद्रा यांचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी शीतल देवी यांना दिलेल्या खास भेटीचेही लोक कौतुक करत आहेत. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टला उत्तर देताना एका यूजरने, 'काहीही अशक्य नाही, शीतल देवी यांनी हे सिद्ध केले आहे आणि ती देशाची चमकणारी तारा आहे,' असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने, शीतल देवीमध्ये तिच्या जिद्दीने आयुष्यात जे काही हवे ते साध्य करण्याची क्षमता आहे, असे म्हटलं आहे.

दरम्यान, चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये 3 पदके जिंकणारी 16 वर्षीय शीतल देवी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथील रहिवासी आहे. जागतिक तिरंदाजीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणारी शीतल देवी हात नसलेली पहिली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने मिश्र दुहेरी आणि एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर महिला दुहेरीत तिने रौप्यपदक पटकावले आहे. दोन्ही हात नसतानाही छाती, दात आणि पाय यांच्या सहाय्याने तिरंदाजी जम्मू-काश्मीरची तिरंदाज शीतल देवी हिने यापूर्वी राकेश कुमारसह पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मिश्र कंपाउंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.