FIFA : कतारमध्ये सुरु असलेला फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. स्पर्धेच्या सामन्याव्यतिरिक्त घडलेल्या घटनांमुळे हा वर्ल्ड कप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय. विविध निर्बंधापासून ते कामगारांच्या मृत्यूंपर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच या स्पर्धेदरम्यान एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फुटबॉल सामन्याचे कव्हरेज करताना या पत्रकाराचा मृत्यू (US journalist Grant Wahl) झाला आहे. मात्र मृत्यूमागे षडयंत्र असल्याचा आरोप पत्रकाराच्या भावाने केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध क्रीडा पत्रकार ग्रँट वॉल यांचा 9 डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यानदरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. माध्यमांच्या वृत्तानुसार, मॅचदरम्यान ग्रँट अचानक पत्रकारांसाठी असलेल्या ठिकाणी कोसळले. प्राथमिक माहितीत हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले मात्र अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.
टी-शर्ट घातल्याने पोलिसांनी घेतले ताब्यात
ग्रॅंट हे वर्ल्ड कपस्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आले होते. अमेरिकेच्या पहिल्या सामन्यावेळी त्यांनी घातलेल्या टी - शर्टमुळे पोलिसांनी ग्रॅंट यांना ताब्यात घेतले होते. एलजीबीटीक्यू समुदायाच्या (LGBTQ community) समर्थनार्थ इंद्रधनुष्य (rainbow) असलेला टी-शर्ट घातला होता. कतारसह अनेक अरब देशांमध्ये समलैंगिक संबंध अजूनही गुन्ह्याच्या श्रेणीत येतात. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सामान्यपणे मृत्यू झाला यावर विश्वास नाही
ग्रॅंट यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. ग्रॅंट यांचा भाऊ एरिक यांनी त्याच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली आहे. एरिक यांनी या प्रकरणी कतार सरकारवर गंभीर आरोप केलेत. माझ्या भावाचा मृत्यू सामान्य पद्धतीने झाला किंवा त्याची हत्या झाली यावर माझा विश्वास नाही. मी तुम्हा सर्वांना मदतीचे आवाहन करतो, असे एरिक यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
Eric Wahl, the brother of sportswriter Grant Wahl who died in Qatar while covering the World Cup, is asking for help.
Grant was detained in Qatar for wearing a rainbow shirt two weeks ago pic.twitter.com/lak0b1UZwa
— philip lewis (@Phil_Lewis_) December 10, 2022
माझ्यासाठी टी-शर्ट घातला
"माझे नाव एरिक वॉल आहे. मी सिएटल, वॉशिंग्टन येथे राहतो. मी ग्रँट वॉलचा भाऊ आहे. मी समलिंगी आहे. माझ्यामुळेच त्याने वर्ल्ड कपमध्ये इंद्रधनुष्य असलेला टी-शर्ट घातला होता. माझा भाऊ एकदम व्यवस्थित होता. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्याने सांगितले होते," असेही एरिक यांनी म्हटलं आहे.
फिफा विश्वचषक आयोजन समितीने सांगितले की, ग्रॅंट यांना स्टेडियममध्येच डॉक्टरांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, समितीने अद्याप मृत्यूचे कारण सांगितलेले नाही.