मुंबई : दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 रन्सने पराभव करत विजेतेपद पटकावलं. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच दक्षिण विभागाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. पश्चिम विभागाच्या 529 धावांच्या डोंगरासारख्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण विभाग केवळ 234 धावांवर गारद झाला. पश्चिम विभागाला तब्बल 12 वर्षांनंतर विजेतेपद पटकावण्यात यश आलंय. या मोठ्या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे टीम इंडियामध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगलीये.
सातत खराब फॉर्मशी झुंज दिल्यानंतर रहाणेला या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर तो रणजी आणि आयपीएलमध्येही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. मात्र आता दुलीप ट्रॉफीमध्ये टीमला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर तो पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकेल, अशी अपेक्षा करण्यात येतेय.
मात्र, याबाबत बोलताना दिग्गज फलंदाजाने दिलेल्या वक्तव्यावरून आता तो स्वत: टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं दिसून येत आहे.
दुलीप ट्रॉफी जिंकल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला, "आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे खरोखर आनंद झाला. सर्वांनी ज्या प्रकारे योगदान दिलं ते विलक्षण होतं. मी एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करतो, भविष्याचा जास्त विचार करत नाही. कोविडनंतरचा पहिला पूर्ण सीझन खेळला गेला आहे. मुंबईसाठी खेळण्यास उत्सुक आहे, इथल्या सुविधा खरोखरच चांगल्या आहेत."
तो पुढे म्हणाला, माझ्या मते विभागीय क्रिकेट आपल्या राज्यांसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचं आहे. भविष्यात भारतासाठी टेस्ट क्रिकेटपटू निवडण्यासाठी रणजी करंडक, इराणी करंडक आणि दुलीप ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे."