मुंबई : भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या सीरीजमधील शेवटचा आणि निर्णायक सामना 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताला पराभावाला सामोरं जावं लागलंय. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल ऐवजी अजिंक्य रहाणेकडेच कर्णधारपदाची धुरा द्यायला हवी होती असं मत माजी खेळाडू वसिम जाफरने व्यक्त केलं आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे उपस्थित असतानाही केएल राहुलला कर्णधारपदाची धुरा देण्याच्या निर्णयावर भारताचा जाफरने नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने कर्णधारपद स्वीकारायला हवं होतं, असं जाफरने मत व्यक्त केलं आहे.
कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी खराब फॉर्ममुळे त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं. मात्र, रहाणेने टीमतील स्थान कायम राखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात 58 रन्स करत भारताला चांगली धावसंख्या गाठण्यास त्याने मदत केली.
एका आर्टिकलमध्ये जाफरने म्हटलंय की, "मी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाने आश्चर्यचकित झालो आहे. जेव्हा तुमच्याकडे अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी खेळाडू आहे, ज्याने कर्णधार म्हणून एकही कसोटी गमावली नाही आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. याची कल्पना असूनही राहुलला कसोटी कर्णधारपद देण्याची गरज आहे?"
जाफर पुढे म्हणाला, "मी केएल राहुलच्या विरोधात नाही. तो तरुण आहे आणि त्याने पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. पण मला वाटतं की कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने टीमचं कर्णधारपद स्विकारलं पाहिजे. दुसऱ्या कसोटीत त्याने नेतृत्व करायला हवं होतं."
दुसऱ्या कसोटीत भारताला विराट कोहलीची उणीव जाणवली, असंही जाफरने सांगितलं. टीम इंडियामध्ये विराट असल्यावर एक वेगळी एनर्जी असते, असं जाफरचं मत आहे.