Afg vs SL Asia Cup Rashid Post Goes Viral: आशिया चषक स्पर्धेमधील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये 'सुपर-4'मधील शेवटचा संघ कोण असेल हे ठरलं. श्रीलंकेनं अफगाणिस्तानला अवघ्या 2 धावांनी पराभूत करत 'सुपर-4'मधील शेवटचं स्थान पटकावलं. अगदी अटीतटीच्या सामन्यामध्ये श्रीलंकेनं निसटता विजय मिळवत पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशबरोबर अंतिम 4 संघांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. अगदी लक्ष्याचा जवळ येऊन पराभूत झाल्याने अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान मैदानात रडू लागला. राशीद खान मैदानामध्ये हताश होऊन बॅटवर डोकं टेकवून रडत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी राशीद खानने केलेले प्रयत्न आणि सामन्यामधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानने एवढी कडवी झुंज दिल्यानंतरही त्याचा पराभव झाल्याबद्दल खेद व्यक्त केला. आता याच रडणाऱ्या फोटोंपैकी एक फोटो थेट राशीद खाननेच आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन (आधीचं ट्विटर अकाऊंटवरुन) पोस्ट करत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
लाहोरच्या गद्दाफी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 292 धावांपर्यंत मजल मारली. रनरेटच्या जोरावर सुपर-4 ची फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला 38.1 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठणं आवश्यक होतं. मात्र या थरारक सामन्यात 2 धावांनी अफगाणिस्तानचा पराभव झाला. सामन्यात पराभव झाल्याने आणि या पराभवाबरोबरच आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना अश्रू आवरता आले नाहीत. जिंकण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या अफगाणिस्तानच्या टीममधील खेळाडू मैदानातच रडू लागले. यामध्ये राशीद खानचाही समावेश होता.
बांगलादेशाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये ब गटातून स्थान निश्चित केलं होतं. अफगाणिस्तानला विजय मिळवून चांगल्या रन रेटने सामना जिंकणं बंधनकारक होतं. श्रीलंकेने दिलेलं लक्ष्य अफगाणिस्तान टीमला 38.1 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठणं आवश्यक होतं. 37 व्या ओव्हरनंतर अफगाणिस्तानला 16 धावांची गरज होती. या षटकामध्ये राशिद खानने 3 चौकार मारून 1 बॉलमध्ये 3 धावा असं समीकरण केलं होतं. मात्र त्याचवेळी मुजीब उर रहमान बाद झाला. विकेट गेल्यानंतरही अफगाणिस्तानला ( Sri Lanka vs Afghanistan ) 2 चेंडूमध्ये 4 किंवा 6 धावांची गरज होती. हे करता आलं असतं तरी अफगाणिस्तान सुपर-4 साठी पात्र ठरला असता. पण तळाचा फलंदाज असलेला फारुकीही एलबीडब्ल्यू झाला. यानंतर नॉन स्ट्राईक एण्डला उभा असलेला राशीद खान मैदानात ढसाढसा रडू लागला. यावेळी अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्येही खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते.
याचसंदर्भात बोलताना स्वत:चा निराश अवस्थेतील फोटो पोस्ट करत राशीदने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "खेळाच्या मैदानामध्ये अनेक चढ उतार येत असतात. तुम्ही शिकता, मोठे होता आणि जोरदार पुनरागमन करता," अशी कॅप्शन राशीद खानने या फोटोला दिली आहे. तसेच "आम्हाला कायम पाठिंबा देणाऱ्यांचे आभार," असंही राशीदने म्हटलं आहे.
In sport there are many ups and downs. You learn, grow and come back stronger.
Thank you for always supporting us #AsiaCup2023 pic.twitter.com/6hF7zzyxf7— Rashid Khan (@rashidkhan_19) September 6, 2023
अफगाणिस्तान हा ब गटातून बाहेर पडलेला संघ ठरला तर नेपाळ हा अ गटातून बाहेर पडला.