फुटबॉलच्या मैदानात तुफान राडा; अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंवर दादागिरी, 'तो' VIDEO आला समोर

 एएफसी आशियाई चषकात भारतीय फुटबॉल संघ चांगल्याच फॉर्मात आहे.

Updated: Jun 12, 2022, 04:30 PM IST
फुटबॉलच्या मैदानात तुफान राडा; अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंवर दादागिरी, 'तो' VIDEO आला समोर  title=

मुंबई : एएफसी आशियाई चषकात भारतीय फुटबॉल संघ चांगल्याच फॉर्मात आहे. एका मागून एक सामन्यावर भारतीय संघ विजयाची नोंद करत चाललाय. मात्र अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. मात्र या विजयानंतर अचानक दोन्ही संघ एकमेकांमध्ये भिडल्याचे समोर आले. या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.  
 
कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (86वा) आणि सहल अब्दुल समद (91वा) यांनी गोल केले.

भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते भारतीय खेळाडूंच्या अंगावर धावून गेले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानचे 3 खेळाडू आणि भारतीय संघाचे 2 खेळाडू हाणामारी करताना दिसतायत.

या घटनेत भारताचा स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंग प्रकरण शांत करण्यासाठी पुढे आला, परंतु अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्याला धक्का दिला. एएफसीचे अधिकारी मैदानावरील खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही संपुर्ण घटना नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसते. व्हिडिओच्या शेवटपर्यत तरी हा वाद काही मिटल्याचे दिसत नाहीए. 

7 वर्षानंतर विजय 
जानेवारी 2016 नंतर भारतीय संघाचा अफगाणिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय होता. यापूर्वी, गेल्या दोन वेळा अफगाणिस्तानच्या संघाला भारताला दोनदा बरोबरीत रोखण्यात यश आले होते. एकूण, भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध 11 सामने खेळला आहे, ज्यात सात जिंकले आहेत आणि एक पराभव पत्करावा लागला आहे.

सुनील छेत्री दिग्गज फुटबॉलपटूंच्या विक्रमानजीक  

अफगाणिस्तानविरुद्ध गोल केल्यानंतर भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने आता 128 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 82 गोल केले आहेत. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोने 189 सामन्यांमध्ये 117 गोल केले आहेत आणि मेस्सीने 86 (162 सामने) केले आहेत.