भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आज जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत असला तरी एकेकाळी त्याच्या आयुष्यात फार चढ-उतार सुरु होते. 2007 ते 2013 दरम्यान रोहित शर्माला फार संघर्ष करावा लागला होता. संघात आपलं स्थान मिळवण्यासाठी त्याला घाम गाळावा लागला आहे, 2011 च्या वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली नव्हती तेव्हा तो प्रचंड नाराज झाला होता. पण 2013 चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर मैदानात एक वेगळा रोहित शर्मा दिसल्याने ज्याने मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वोत्तम आघाडीच्या फलंदाजात त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं. दोन वेळा दुहेरी शतक ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे त्याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं.
आज रोहित शर्मा यशस्वी फलंदाज, कर्णधार असला तरी त्याच्या वाट्यालाही अनेक आव्हानं आली होती. संघर्ष सुरु असताना त्याला सोशल मीडियावरुनही टीकेचा सामना करावा लागला होता. अनेक माजी खेळाडूंनी कशाप्रकारे वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने रोहित शर्माने स्वत:ला बदललं याचा खुलासा केला आहे. दरम्यान आता रोहित शर्माचा जवळचा मित्र अभिषेक नायरने याआधी कधीही न सांगितलेला किस्सा सांगितला आहे. या घटनेनंतर रोहित शर्माच्या करिअरमध्ये एक मोठा बदल झाला. अभिषेक नायर हा कोलकाता नाईट रायडर्सचा असिस्टंट कोचही आहे.
"जेव्हा रोहित शर्माची 2011 वर्ल्डकपसाठी निवड झाली नव्हती, तेव्हा मी त्याला नेहमी आपण मेहनत करु असं सांगत होता. त्यावेळी त्याचं वजन थोडं वाढलं होतं. यादरम्यान त्याचा आणि युवराज सिंगचा एक फोटो दाखवण्यात आला होता. या फोटोत रोहित शर्माच्या ढेरीच्या दिशेने एक बाण दाखवण्यात आला होता. मी ते कधीच विसरणार नाही. आम्ही तेव्हा घऱातच टीव्ही पाहत होतो. ते व्हिज्युअल पाहिल्यानंतर रोहित शर्माने, मला हा समज बदलायला हवा असं म्हटलं होतं," असा खुलासा अभिषेक नायरने युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
रोहित तोपर्यंत विश्वचषक विजेता बनला होता आणि त्याने सीबी मालिकेच्या पहिल्या अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती, ज्याने सचिन तेंडुलकरच्या शतकासह भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर हरवून ट्रॉफी जिंकण्यास मदत केली. 2011 मध्ये, जेव्हा रोहितचे नाव वर्ल्डकपसाठी घोषित केलेल्या 15 सदस्यीय संघाचा भाग नव्हते, तेव्हा रोहितचे वेदनादायक ट्विट आजही त्याच्या चाहत्यांच्या लक्षात आहे.
"काही दिवसांनंतर, विश्वचषक संघाची घोषणा करण्यात आली, परंतु तो संघाचा भाग नव्हता. त्याचवेळी रोहित शर्मा हिटमॅन बनला. कारण त्याने त्याचा दृष्टीकोन आणि करिअरची वाटचाल बदलण्याचा निर्णय घेतला होता. लोकांची मतं बदलत यशस्वी क्रिकेटर होणारा तो पहिला व्यक्ती होता ज्याच्यासोबत मी हा प्रवास केला," असंही अभिषेक नायरने सांगितलं.
"लोक त्याच्याबद्दल खूप काही बोलायचे. दोन मिनिटांचा मॅगी-मॅन वैगेरे गोष्टी. रोहित शर्माबद्दल खूप गोष्टी सांगितल्या गेल्या. त्यामुळे सगळंच बदलून गेलं. तो मला म्हणाला, 'तुम्ही जे सांगाल ते मी करेन. जेव्हा आयपीएल संपेल तेव्हा लोकांनी 'तो तोच रोहित शर्मा नाही तो दुसरा कोणीतरी आहे' असे म्हणावे", अशी माहिती अभिषेक नायरने दिली.