Hartalika 2024 : महिलांमध्ये हरतालिकेचं व्रत अतिशय श्रेष्ठ मानलं जातं. हे व्रत विवाहित महिलांसोबत कुमारिका आणि विधवा महिलाही करु शकतात. त्यामुळे या व्रताला अतिशय महत्त्व आहे. हरतालिका व्रत हे विवाहित महिला पतीच्या दीर्घयुष्यासाठी तर कुमारिका चांगला नवरा मिळवण्यासाठी करतात. हे व्रत अतिशय कठीण मानलं जातं. हरतालिका व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी करण्यात येतं.
यंदा हे व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. हरतालिकेच्या आदल्या दिवशी आवरणं केलं जातं. आवरणं या शब्दाचा अर्थ आवरणे असाच होता. खरं तर महिलांचं हे आवडतं आणि रोजचं काम आहे. त्यात जर सण उत्सव असेल तर विचारायला नको, महिलांना आवरण्याचा ऊत येतो. आता तर महिलांच्या मदतीला घरातील कर्तेधरते पुरुषही त्यांना मदत करतात.
संसार दोघांच्या म्हटलं की, तो दोघांनी सावरायचा असतो. मग आवरायला का हरकत आहे. हरतालिकेच व्रत महिला आपल्या पतीच्या निरोगी आयुष्य आणि दीर्घयुष्यासाठी प्रार्थना करतात. हे व्रत फक्त फळांवर केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ते व्रत सोडलं जातं. त्यामुळे हरतालिकेच्या आदल्या दिवशी आवरणं केलं जातं.
या दिवशी घरात महिला गणेश, गौरी आगमनाची तयारी करतात. तर दुसऱ्या दिवशी उपवास असल्याने आजच्या दिवशी घरात अनेक पक्वान करण्यात येतात. थालिपीठ, तीखट पुऱ्या ,बटाटा भाजी, मसालेभात, मटकी, मटार उसळ, शिरा, पुरणपोळी, कटलेट, श्रीखंड, आळूवडी, कोंथिबीर वडी,लाडू, चिवडा, शंकरपाळे, फरसाण हे पदार्थ आवडीने मनसोक्त खाले जातात. मग त्या कडक उपवास करायला सज्ज असं म्हटलं जातं.
त्यासोबत परिसरातील सर्व मैत्रिणी एकत्र हरतालिकेसाठी घराशेजारी बागेत, परिसरात पत्री गोळा करायला जातात. ताजी फुले, फळे, पत्री म्हणजे सोळा पत्री-बेल, तुळशी, दूर्वा, प्राजक्त, आघाडा, माका, धोतरा, केवडा, मोगरा, शेवंती,चाफा, सब्जा, आवळी, केळी, अशोक, कण्हेरी, जास्वंद, गुलबक्षी, कमळ, कदंब, ब्राम्ही, आंबा, सिताफळ, रामफळ घेऊन येतात.
आवरणं या शब्दाचा अजून एक अर्थ असाही होतो घडून गेलेल्या गोष्टी नजरेआड करणे,चुकला असेल तर समजावून पुन्हा संधी देणे. खरं तर या आवरणं ला जो तो आपल्या परीने अर्थ घेऊ शकतो. त्याशिवाय आयुष्यात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा खरा उद्देश असतो.