Holi 2024 : हिंदू धर्मातील होळी हा शेवटचा सण आहे. यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आणि होळीवर चंद्रग्रहणाचं ग्रहण असल्याने लोक संभ्रमात पडले आहे. यंदा होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करायचा की नाही. जर करायचा असेल तर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय? कारण होलिका दहनावर भद्राचं सावट असल्याने होलिका दहन कुठल्या मुहूर्तावर करायचं हे आणि असं अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. (Holi 2024 bhadra kaal holika dahan 24 March shubh muhurat holika dahan special yogas in marathi)
पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करण्यात येतं आणि तिच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. ग्रामीण भागात पंचमी तिथीला रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्साह साजरा करण्यात येतो. यंदा होलिका दहन रविवारी 24 मार्चला तर सोमवारी 25 मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे.
धर्मशास्त्रात भद्र काळात शुभ कार्य केलं जातं नाही. होलिका दहनाच्या दिवशी भद्रा काळ सकाळी 9.54 ते रात्री 11.13 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे होलिका दहन कधी करायचं हा प्रश्न पडला आहे. आनंद वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय.
फाल्गुन पौर्णिमा तिथी - 24 मार्चला सकाळी 9:54 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला दुपारी 12:29 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार होलिका दहन 24 मार्चला करायचे आहे.
होलिका दहन 24 मार्च 2024 ला शुभ मुहूर्त रात्री 11.13 ते रात्री 12.27 वाजेपर्यंत आहे. अन्यथा गोरज मुहूर्तावरही होलिका दहन करु शकता.
होलिका पूजा - होलिका प्रदोष काळात ही पूजा करण्यात येते. होलिकी पूजेची शुभ वेळ संध्याकाळी 06.35 ते रात्री 09.31 वाजेपर्यंत आहे.
यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग 24 मार्च 2024 ला सकाळी 07.34 ते 25 मार्च 2024 सकाळी 06.19 वाजेपर्यंत असणार आहे. रवि योग 24 मार्च 2024 ला सकाळी 06.20 ते सकाळी 07.34 वाजेपर्यंत तर वृद्धी योग हा 24 मार्च 2024 ला रात्री 08.34 ते 25 मार्च 2024 ला रात्री 09.30 वाजेपर्यंत असणार आहे. तर यादिवशी मंगळ आणि शुक्र यांच्या कुंभ राशीमध्ये संयोग होणार आहे. त्यामुळे धन शक्ती योग निर्माण होणार आहे. त्यासोबत होळीच्या दिवशी शनि, मंगळ, शुक्र कुंभ राशीत असल्याने त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे. शिवाय होळीच्या दिवशी सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार. या योगामुळे व्यक्तीला व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात यश मिळणार आहे.
आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे की, या वर्षातील पहिलं चंद्रग्रहणाचा होळी किंवा धुलिवंदनावर परिणाम होणार नाही. कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळ पाळला जाणार नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)