Rishi Panchami 2024 : लहानपणापसून ऐकताय ‘सप्तऋषी’, पण ते 7 ऋषी नेमके कोण होते? येथे वाचा

Rishi Panchami :दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षात पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते, यावर्षी रविवार ८ सप्टेंबरला ऋषीपंचमी आहे. यादिवशी सप्त ऋषींना समर्पित व्रत केले जाते. 

Updated: Sep 7, 2024, 06:16 PM IST
Rishi Panchami 2024 : लहानपणापसून ऐकताय ‘सप्तऋषी’, पण ते 7 ऋषी नेमके कोण होते? येथे वाचा title=

Rishi Panchami 2024 :ऋषीपंचमीला ऋषी कश्यप, ऋषी अत्री, ऋषी भारद्वाज, ऋषी विश्वामित्र, ऋषी गौतम, ऋषी जमदग्नी आणि ऋषी वशिष्ठ यांची पूजा केली जाते. हे सात ऋषी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश  असल्याचे मानले जाते. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-शांती मिळते. चला जाणून घेऊया कोण आहेत हे सप्त ऋषी आणि त्यांचे महत्त्व

ऋषी कश्यप
ऋषी कश्यप यांना सगळ्या ऋषी मुनींमध्ये श्रेष्ठ मानले जाते. त्यांना सृष्टीचे जनक म्हणूनही ओळखले जाते. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मारिचीचा पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव कला होते. कश्यप ऋषींना अनिष्टनेमी असेही म्हणतात. त्यांनी अनेक स्मृती ग्रंथांची रचना केली होती. आजच्या काश्मीर प्रदेशात त्यांचे आश्रमाचे ठिकाण होते असे मानले जाते. काश्मीरचे नाव कश्यप ऋषींच्या नावावरूनच ठेवण्यात आले आहे. कश्यप ऋषींच्या नावाने एक विस्तृत गोत्रही तयार केले आहे. अदिती, दिती, दनु, काष्ठ, अरिष्ट, सुरासा, इला, मुनी, क्रोधवशा, ताम्रा, सुरभी, सुरासा, तिमी, विनता, कद्रू, पतंगी आणि यामीन या कश्यप ऋषींच्या पत्नी होत्या. त्यांनी अनेक स्त्रीयांशी लग्न करून आपला वंश वाढवला म्हणून त्यांना सृष्टीचे जनक म्हणातात. कश्यप ऋषींनी भगवान शिवाला शाप दिला होता. वेद, पुराण, स्मृती, उपनिषद आणि इतर धार्मिक साहित्यात कश्यप ऋषीबद्दल बरीच माहिती आढळते.

 

हेही वाचा : गणपतीला आवडत नाहीत या चार वस्तू, चुकूनही करू नका अर्पण

 

अत्री ऋषी
अत्री किंवा अत्री हे वैदिक ऋषी आहेत. ज्यांनी अग्नी, इंद्र आणि हिंदू धर्मातील इतर देवतांसाठी अनेक स्तोत्रे रचली. अत्रि हे हिंदू परंपरेतील सप्तऋषी पैकी एक आहेत. आपल्याला ऋग्वेदामध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाला (पुस्तकाला) त्यांच्या सन्मानार्थ अत्री मंडल असे म्हणतात. अत्रींचा उल्लेख पुराण आणि हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारतातही आहे. आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षी नक्षत्रा मध्ये अत्रि हा एक तारा आहे. अत्रि ऋषींचा आश्रम राजगढ जिल्ह्यामधून वाहणाऱ्या निर्विंध्या नदीकिनारी होता.

ऋषी भारद्वाज
भारद्वाज हे प्राचीन हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध ऋषी आहेत. जे सप्त ऋषींपैकी एक आहेत. वनवासात राम ज्या ऋषींना भेटतो त्यापैकी एक भारद्वाज आहे. त्यांनीच इंद्राला आयुर्वेदाचे ज्ञान देण्यास सांगितले, जेणेकरुन मानवांना आध्यात्मिक साधना करण्याचे सामर्थ्य मिळू शकेल. ते आयुर्वेदनिपुण होते. ते शिक्षाशास्त्री, राजतंत्र मर्मज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधि वेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ, विज्ञान व्यक्ता व मंत्रद्रष्टा होते. भारद्वाज ऋषी हे विमान शास्त्रातही निपुण होते. त्यांनी विमानाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्णन केले होते.

ऋषी विश्वामित्र
ऋषी विश्वामित्र हे एक प्रचंड ज्ञानी आणि तेजस्वी ऋषी होते. रामाला गुरू वशिष्ठ यांनी प्रशिक्षित दिले होते, पण ऋषी विश्वामित्रांनीच त्याला आकाशीय शस्त्रे दिली. विश्वामित्रांनी त्यांच्या सखोल ध्यान आणि खूप कडक तपश्चर्या केली. विश्वामित्रांच्या तपश्चर्येला घाबरून इंद्राने त्याच्या तपभंगासाठी मेनका अप्सरेला पाठवले. तपभंग झाला आणि विश्वामित्राला मेनकेपासून शकुंतला ही कन्या झाली.

 

हेही वाचा : गुगल मॅपला कसं कळतं कुठे आहे ट्रॅफिक जाम?

 

ऋषी गौतम 
गौतम ऋषी वैवस्वत मन्वंतरातल्या सप्तर्षींमधील एक ऋषी आहेत. पण आकाशात दिसणाऱ्या सप्तषीं ताऱ्यांमध्ये ह्यांचे नाव नाही. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहिल्या आहे. ती गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा झाली. पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती परत मनुष्यरूपात आली. तर गौतमाच्या शापाने इंद्राच्या शरीराला सहस्र छिद्रे पडले होते. त्या छिद्रांचे उःशापामुळे डोळे झाले. या हजार डोळ्यांमुळे इंद्राला सहस्राक्ष असे म्हणतात.

ऋषी जमदग्नी
सर्व पौराणिक साहित्यात त्याच्या पुत्रांनी त्याला अत्यंत कोपिष्ट स्वभावाचा असल्याचे सांगितले आहे. स्वतःच्या कोपिष्ट स्वभावामुळे पत्नी आणि पुत्रवधाचे पातक आपल्या हातून घडले याचा जमदग्नीस पुढे पश्चात्ताप होऊन त्याने आपला कोपिष्ट स्वभाव सोडला आणि तो शांत झाला, अशी कथा जैमिनी अश्वमेधात सांगितली आहे. हिंदू धर्मातील श्राद्धविधीचा आरंभ त्यानेच केला असे मानतात.

ऋषी वशिष्ठ
वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या दहा मानसपुत्रांपैकी एक होते असे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या एका प्राणापासून त्यांची उत्पत्ती झाली, असे भागवतात सांगितले आहे. दक्ष प्रजापतीची कन्या ऊर्जा ही वशिष्ठ यांची पत्‍नी. दक्षयज्ञाच्या वेळी अपमानित झाल्यामुळे शिवाने ज्यांचा वध केला, त्यांत वसिष्ठांचाही वध झाला होता. ‘वसिष्ठ’ म्हणजे ‘सर्वांत अधिक समृद्ध असलेला’. वसिष्ठांकडे अद्‍भुत सामर्थ्य असलेली कामधेनू नावाची एक गाय होती, ही कथा त्यांच्या ह्या नावाच्या अर्थाशी सुसंगत आहे. सर्व वस्तूंचे नियंत्रण करीत असल्यामुळे त्यांना ‘वसिष्ठ’ म्हणतात, असेही उल्लेख आहेत.