सावधान! इंटरनेटवर तुम्हीही शोधताय Cutomer Care? फसवणूक होण्याची दाट शक्यता

तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडली असेल आणि ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही इंटरनेट वरून नंबर शोधत असाल तर सावधान..! तुमची फसवणूक होऊ शकते..! पिंपरी चिंचवड च्या हिंजवडी पोलिसांनी असाच एक गैरप्रकार उघड केला आहे. 

Updated: Aug 4, 2022, 10:16 AM IST
सावधान! इंटरनेटवर तुम्हीही शोधताय Cutomer Care? फसवणूक होण्याची दाट शक्यता  title=
प्रतिकात्मक फोटो

कैलास पूरी, पिंपरी चिंचवड: तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडली असेल आणि ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही इंटरनेट वरून नंबर शोधत असाल तर सावधान..! तुमची फसवणूक होऊ शकते..! पिंपरी चिंचवड च्या हिंजवडी पोलिसांनी असाच एक गैरप्रकार उघड केला आहे. 

वाकड परिसरात राहणाऱ्या अरुण डुंबरे यांचे व्हर्लपूल कंपनीचे फ्रीज बंद पडले. त्यामुळे त्यांनी नेटवरून नंबर शोधला आणि कॉल केला. तेंव्हा त्याच्या घरी कंपनीचे अधिकृत कर्मचारी म्हणून रफीउद्दीन चौधरी आणि मोहम्मद फिरोज या दोन व्यक्ती आल्या. त्यांनी फ्रीज दुरुस्त केल्याचा बनाव करत कंपनीचे खोटे बील देत त्यांच्या कडून 3250 रुपये उकळले. 

नुकतेच दुरुस्त करूनही फ्रीज चालत नसल्याचे लक्षात आल्यानंतर डुंबरे यांनी पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली. अधिक तपास केला असता मुंबईच्या मालाड भागातील पिंपरीपाडा इथे बनावट कस्टमर केअर सेंटर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कुरार पोलिसांच्या मदतीने बनावट कस्टमर केअर वर छापा टाकत मास्टरमाइंडला अटक केली. 

अशोक कुमार धुकाराम माली, जयप्रकाश धुकाराम माली, पारस कुमार गौराराम माली या तिघांना मुंबईतून अटक केली. अशोक कुमार माली सेंटरचा मालक आहे. तर जयप्रकाश चालक आहे. पारसकुमार सेंटरचा स्टाफ म्हणून काम पाहत होता. या तिघाबरोबर अल्पवयीन मुलींनाही पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलंय. 

चौकशी नंतर अशोक कुमार माली याने गुगल वर विविध कंपन्यांचा कस्टमर केअर नंबर म्हणून जाहिरात दिल्याचे समोर आले आहे. त्यात टोल फ्री नंबर देऊन जो व्यक्ती दिलेल्या नंबर वर कॉल करेल त्यांच्या घरी बनावट कर्मचारी पाठवून त्यांची फसवणूक केली जात असल्याच उघड झालंय. या प्रकरणी हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.