अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील नील आचार्यचा मृत्यू; 2 दिवसांत 2 भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ

Indian Student death in US: अमेरिकेत बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. नील आचार्य असं या विद्यार्थ्याचं नाव असून, त्याच्या आईने मदत मागितल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 30, 2024, 12:28 PM IST
अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील नील आचार्यचा मृत्यू; 2 दिवसांत 2 भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ title=

Indian Student death in US: अमेरिकेत मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईने मदत मागितली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. 

Tippecanoe County Coroner च्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता अधिकाऱ्यांना वेस्ट लाफायेट येथील 500 एलीसन रोड येथे बोलावण्यात आलं होतं. फॉक्स 59 चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकारी पोहोचले असताना विद्यापीठात प्रयोगशाळेच्या बाहेर विद्यार्थी मृतावस्थेत आढळला. 

नील आचार्य अशी नंतर या मृत विद्यार्थ्याची ओळख पटली. तो विद्यापीठाच्या जॉन मार्टिनसन ऑनर्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये डबल मेजर होता.

विद्यापीठाचे संगणक विज्ञान प्रमुख ख्रिस क्लिफ्टन यांनी द एक्सपोनंटला सांगितलं की, त्यांना सोमवारी डीन ऑफ स्टुडंट्सच्या कार्यालयाकडून नील आचार्यच्या मृत्यूची पुष्टी करणारा ईमेल मिळाला आहे. क्लिफ्टन यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये लिहिलं आहे की, "मी तुम्हाला अत्यंत दुःखाने कळवत आहे की, आमच्या विद्यार्थ्यांपैकी एक नील आचार्य याचं निधन झालं आहे. त्यांचे मित्र, कुटुंब सर्वांप्रती आमच्या संवेदना आहेत". क्लिफ्टनने आचार्य अभ्यासात फार हुशार होता अशी माहिती दिली आहे. 

उबर ड्रायव्हरसोबत शेवटचा दिसला होता

रविवारी नीलची आई गौरी आचार्य यांनी एक्सवरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "आमचा मुलगा नील आचार्य 28 जानेवारीपासून बेपत्ता आहे. तो अमेरिकेतल्या Purdue विद्यापीठात शिकतो. उबर चालकाने त्याला विद्यापीठाबाहेर सोडलं तेव्हा तो शेवटचा दिसला होता. आम्ही त्याच्यासंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया तुम्हाला काही समजलं तर आम्हाला कळवा".

शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने गौरी आचार्य यांच्या पोस्टला उत्तर दिलं होतं की, "वाणिज्य दूतावास विद्यापीठातील अधिका-यांच्या संपर्कात आणि नीलच्या कुटुंबाशीही संपर्कात आहे. वाणिज्य दूतावास सर्व शक्य सहकार्य आणि मदत करेल."

पण दुर्दैवाने यानंतर नील आचार्य याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. 

आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातील अमेरिकेतील लिथोनिया, जॉर्जिया येथे एका दुकानात एका बेघर माणसाने हातोड्याने वारंवार वार करून एका भारतीय विद्यार्थ्याचा निर्घृणपणे खून केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विवेक सैनी असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहेत. 24 जानेवारीला विवैक सैनीचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला होता.