जीएसटी प्रणालीत त्रुटींमुळे अपेक्षित कामगिरी झाली नाही- निर्मला सीतारामन

सीतारामन यांनी जीएसटी काही अंशी अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.

Updated: Oct 12, 2019, 08:09 AM IST
जीएसटी प्रणालीत त्रुटींमुळे अपेक्षित कामगिरी झाली नाही- निर्मला सीतारामन title=

पुणे: उद्योगक्षेत्राच्या अपेक्षेप्रमाणे वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी होऊ शकली नाही, याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खंत व्यक्त केली. मात्र, त्यामुळे संपूर्ण जीएसटी प्रणालीचा धिक्कार करता कामा नये. काही झाले तरी जीएसटी आता कायद्याचा एक भाग आहे, असे सीतारामन यांनी म्हटले. निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात उद्योग वर्तुळातील मान्यवरांशी संवाद साधला. 

यावेळी सीतारामन यांनी जीएसटी काही अंशी अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. त्यांनी म्हटले की, या देशात अनेक वर्षांनंतर अनेक राजकीय पक्ष आणि राज्यांनी मिळून एक कायदा तयार केला आहे. त्यामुळे केवळ काही कटू अनुभवांमुळे आपण संपूर्ण जीएसटी प्रणालीचा धिक्कार करू शकत नाही. 

जीएसटीची अंमलबजावणी झाल्याच्या पहिल्या दिवसापासून उद्योजकांना त्याचा फायदा व्हावा, अशी आमची इच्छा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही, यासाठी मी तुमची माफी मागते. जीएसटी प्रणालीत कदाचित त्रुटी असतील, त्यामुळे तुम्हाला (उद्योजकांना) त्रास होत असेल. पण सरतेशेवटी तो या देशाचा कायदा आहे, हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे जीएसटीला अधिक चांगले स्वरूप देण्यासाठी एकत्रपणे काम करण्याचे आवाहन निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना केले. 

या कार्यक्रमाला काही सनदी लेखापाल (सीए) उपस्थित होते. त्यापैकी एकाने जीएसटीतील त्रुटींवर बोट ठेवले. त्याने म्हटले की, जीएसटी ही सोपी व्यवस्था असेल, अशी आमची अपेक्षा होती. व्यवसाय करताना आम्हाला त्याची उद्दिष्टे माहिती असतात. सरकारला यामधील जटीलपणा, कज्जेदलाली, भ्रष्टाचार हटवून संपूर्ण व्यवस्था सुरळीत करायची आहे. जेणेकरून सरकारचा महसूल वाढेल. मात्र, जीएसटी अंमलात आणताना यादृष्टीने आमची मते विचारातच घेण्यात आली नाहीत. जीएसटीमध्ये पाच प्रमुख त्रुटी आहेत. त्यामध्ये सुधारणा झाली तर कायद्यात काहीही बदल न करता सर्वांवरील भार आपोआप हलका होईल. तरच खऱ्या अर्थाने जीएसटी प्रणालीचे उद्दिष्ट साध्य होईल. सध्याच्या घडीला उद्योजक, सल्लागार आणि लेखापरीक्षक सर्वजण जीएसटीवरून सरकारला शापच देत आहेत, असे त्यांनी सांगितले.