'चला हवा येऊ द्या'चे नाबाद 400 एपिसोड

Aug 16, 2018, 17:05 PM IST
1/4

मुंबई : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात.   

2/4

सर्व प्रेक्षकांना हास्याचा व मनोरंजनाचा डबल डोस देणाऱ्या कार्यक्रमाचे ४०० भाग पूर्ण होणार म्हणजे मोठं सेलिब्रेशन तर होणारच आणि म्हणूनच प्रेक्षक २० ते २४ ऑगस्ट पर्यंत 'चला हवा येऊ द्या' हास्य मॅरेथॉनचा आनंद घेऊ शकणार आहेत. ४०० भागांच्या या धमाल मस्तीमध्ये रंगलेल्या सेलिब्रेशनमध्ये सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले. चित्रपटसृष्टीतील ३ नावाजलेले जाधव म्हणजेच दिग्दर्शक संजय जाधव, रवी जाधव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव हे त्यांच्या दमदार डान्स परफॉर्मन्सने सर्वांना थिरकायला लावणार आहेत.

3/4

सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे. 

4/4

सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने श्रीदेवीला मानवंदना देत हवा-हवाईवर परफॉर्म करणार आहे. तसच सर्वांना हसवण्यासाठी अभिनेता पुष्कर श्रोत्री हसवा फसवी मधील काही पात्र प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. थुकरट वाडीतील विनोदवीर देखील प्रेक्षकांसाठी हास्य-स्फोटक कलाकृती सादर करणार आहेत.