Video: 'I, Nilesh Dnyandev Lanke..', लंकेंची थेट इंग्रजीत शपथ; हात जोडत 'रामकृष्ण हरी'ने शेवट

Nilesh Lanke Took Oath In English: अहमदनगरमधील लोकसभा निवडणुकीदरम्यान सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंकेंच्या इंग्रजीवरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. तेव्हापासून हा विषय चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 25, 2024, 12:20 PM IST
Video: 'I, Nilesh Dnyandev Lanke..', लंकेंची थेट इंग्रजीत शपथ; हात जोडत 'रामकृष्ण हरी'ने शेवट title=
निलेश लंकेंना त्यांच्या भाषेवरुन सुजय विखे-पाटलांनी डिवचलं होतं

Nilesh Lanke Took Oath In English: 'I, Nilesh Dnyandev Lanke Having Being Elected A Member Of House Of People... अशी अस्सल इंग्रजीमध्ये खासदारकीची शपथ घेत अहमदनगरचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 18 व्या लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांचा शपथविधी कालपासून सुरु आहे. देशात तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यानंतरच हे पहिलेच अधिवेशन असून नियमाप्रमाणे पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व नवनर्वाचित खासदारांना शपथ दिली जाते. यानुसार आज शरद पवार गटाच्या खासदारांना शपथ घेण्यात आली. विशेष म्हणजे निलेश लंकेंनी थेट इंग्रजीमध्ये शपथ घेतली. अहमदनगरचे माजी खासदार आणि निलेश लंकेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवलेले खासदार सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंकेंना संसदेत जाऊन इंग्रजी तरी बोलता येईल का अशी टीका केली होती. मात्र याच टीकेला थेट शपथ घेण्यापासूनच निलेश लंकेंनी जसेच्या तसे उत्तर दिल्याची चर्चा सध्या आहे.

नेमकं काय म्हणालेले सुजय विखे-पाटील?

अहमदनगर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यावरुन निशाणा साधला होता. एका भाषणात तर लंकेच्या शिक्षणावरूनही सुजय विखे-पाटील यांनी टीका केली होती. “निलेश लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार नाही”, असं आव्हानही सुजय विखे पाटील यांनी दिलेलं. लंके यांनी प्रचारकळात विखेंच्या टीकेला उत्तर दिलेलं. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून निलेश लंके यांनी भाजपाच्या उमेदवार सुजय विखे पाटलांचा 28 हजार मतांनी धुव्वा उडवला. विजयानंतरही लंकेंनी अनेक ठिकाणी इंग्रजीमधूनच संसदेत भाषण करणार, प्रश्न विचारणार असं म्हटलं होतं. आज लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेऊन आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीची सुरुवातच इंग्रजीत केली आहे. 

'रामकृष्ण हरी'ने शपथीचा शेवट

निलेश लंकेंनी संपूर्ण शपथ इंग्रजीत घेतल्यानंतर शेवटी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी' असं म्हणत हात जोडून सभागृहाला अभिवादन केलं. निलेश लंके जेव्हा शपथ घेऊन वेलमध्ये कॅटलॉगवर स्वाक्षरी करण्यासाठी उतरले तेव्हा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यासहीत इतर खासदारांनी हसत हसत त्यांचं अभिनंदन केलं. 

वर्धापनदिनी सुद्धा इंग्रजीची झलक

मात्र त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातही इंग्रजीत भाषणाला सुरुवात करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे सुजय विखे पाटलांवर निशाणा साधला होता. 10 जून रोजी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन साजरा केला. या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात निलेश लंके यांनी थेट इंग्रजीमध्ये बोलत दमदार भाषण केलं. लंके आपल्या भाषणाला सुरुवात करताना पक्षाध्यक्ष शरद पवारांबद्दल बोलताना “सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची… Pawar is the Power… सगळ्यांचा नाद करायचा, पण पावारांचा नाद केला तर ते भल्याभल्यांना घरी बसवतात. शरद पवार हे आम्हा सर्वांचं दैवत आहे,” असं म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

इंग्रजी शपथेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

निलेश लंकेंनी खासदारकीची इंग्रजीमध्ये शपथ घेतल्यासंदर्भात शरद पवारांना पत्राकरांनी विचारलं असता त्यांनी, 'भाषेबद्दल बोलणार नाही,' असं मोजक्या शब्दात उत्तर दिलं.