LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईमध्ये पुढील काळात होणाऱ्या सभांच्या मुद्द्यावरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यंदा महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत जवळपास दुप्पट सभा घेत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. याच प्रश्नावरुन राऊत यांनी मोदींना थेट मुंबईत घर घेण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात 9 सभा झाल्या होत्या. यंदा दुप्पटीने सभा पाहायला मिळत आहेत, असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी, '27 सभा मोदी घेत असून 7 सभा मुंबईत घेत आहेत,' असं म्हटलं. पुढे बोलताना, "मुंबईत ते 7 ते 8 सभा घेत आहे त्याचं कारण नकली शिवसेना त्यांच्याबरोबर आहे. त्याचा त्यांना काही फायदा होणार नाही. अजित पवारांच्या नकली राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना काही फायदा होत नाही," असं राऊत म्हणाले.
"मुख्य म्हणजे स्वत: नरेंद्र मोदी हा ब्रॅण्ड महाराष्ट्रातून नाही तर देशातून संपला आहे. त्यांनी कितीही आदळाआपट केली, सभा घ्याव्यात, भाषणं द्यावीत. आमच्या नावाने बोटं मोडावीत, आमच्या नावाने दाढी खाजवावी, काहीही होणार नाही. महाराष्ट्रात आम्ही 35 ते 40 जागा जिंकत आहोत. हवी तर मोदींनी ठाण मांडावी मुंबईत. हवं तर पेडर रोडला घर घ्यावं तात्पुरतं. आम्ही त्यांना घर बघून देतो. काही फायदा होणार नाही. आम्ही महाराष्ट्रही जिंकतोय आणि देशही," असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे
मुंबईतील मोदींच्या सभेला राज ठाकरे उपस्थित असतील यासंदर्भात बोलताना, "असू द्या उपस्थित. महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला महाराष्ट्र पाहील. अमित शाह आणि नरेंद्र मोदींना पाय ठेऊ देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते मराठी माणसाचे शत्रू आहेत असं सांगणारे हे सद्गृहस्थ मांडीला मांडी लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार," असा टोला राऊत यांनी लगावला.
नक्की वाचा >> 'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
राज ठाकरेंनी शुक्रवारी पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतल्याच्या मुद्द्यावरुन राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खास आपल्या शैलीत मनसे आणि ठाकरेंना टोला लगावला. "काही नेते आणि काही पक्ष यांची दखल घ्यावी अशी महाराष्ट्राची स्थिती नाही," असा टोला राऊत यांनी मनसेला लगावला.