नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपमधील बंडखोरीच्या मुद्द्यावर भाष्य केले.
आठवले यांनी म्हटले की, बंडखोरांना मी आवाहन करतो की, त्यांनी पक्षाचे काम करावे. तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नये. सत्ता आल्यावर त्यांना संधी नक्की मिळेल. एकनाथ खडसे यांनाही आगामी काळात राज्यपालपद नक्की मिळेल, असा दावा रामदास आठवले यांनी केला.
भाजपकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या मंत्रीपद भुषविलेल्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आहे. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे या सगळ्यांचे पत्ते कट झाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट
मात्र, भाजपने कोणाचेही तिकीट कापलेले नाही, फक्त जबाबदाऱ्या बदलल्या आहेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यामुळे नेत्यांची तिकीट कापलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी फक्त दुसऱ्या कार्यकर्त्याला देण्यात आली आहे. काहीजण विधानसभेत असतात तर काहीजण विधानसभेबाहेर राहून पक्षाचे काम करतात, असे फडणवीस यांनी सांगितले होते.