दादा `जरा जपून जपून.. पुढे धोका आहे...`

एक वक्तव्य आणि संपूर्ण कारकिर्दीला काळिमा... ‘तो कुणी तरी देशमुख आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. ५५ दिवस झाले. मग काय झालं, सुटलं का पाणी? पाणीच नाही धरणात तिथं मुतायचं का?

Updated: Apr 9, 2013, 09:00 AM IST

रोहित गोळे, कॉपी रायटर, www.24taas.com
एक वक्तव्य आणि संपूर्ण कारकिर्दीला काळिमा... ‘तो कुणी तरी देशमुख आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. ५५ दिवस झाले. मग काय झालं, सुटलं का पाणी? पाणीच नाही धरणात तिथं मुतायचं का? बरं मुतण्यासाठी पुन्हा पाणीच लागेल. पाणीच नाही प्यायला तर लघवी तरी कुठून होणार? रात्री भारनियमन केलं जात आहे.’ त्यामुळे माझ्या असं लक्षात आलंय की याच काळात मुलांच्या जन्माचं प्रमाण वाढतंय. लाईटच नाही म्हटल्यावर दुसरा उद्योग काय करणार? आरं तुम्ही म्हणाल आज काय सकाळीच टाकून आलाय की काय?’ आणि याच वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली.
दादांनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगलं नाही आणि त्यांच्यावर तीन-तिनदा माफी मागण्याची नामुष्की ओढावली... मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं आणि त्यानंतर मात्र दादांना त्यांची चूक कळली. (सत्ता आणि पद जाण्याच्या भीतीने) त्यांनी माफीनामा सत्र सुरू केलं. दुखावलेली जनता, दुष्काळाने होरपळलेली जनता... आणि त्यात दादांनी केलेले कमरेखालचे विनोद याचा भडका उडालाच... महाराष्ट्रात ठिणगी पडण्याचा अवकाश हवा होता... आणि ती ठिणगी पडलीच... याच ठिणगीने दादांच्या वक्तव्याच्या वणवा होण्यास वेळ लागला नाही. सुरवातीला या वक्तव्याचे गांभीर्य विरोधी पक्षाच्याही लक्षात आले नाही. ही शोकांतिकाच म्हणायला हवी... पण पुन्हा एकदा मीडियाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. आणि मात्र नेत्यांना खडबडून जाग आली. ‘माफी नको, राजीनामा हवा.’ अशी बोंब मारीत विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले.

आता पुन्हा एकदा सत्ता जाते की काय अशी अवस्था निर्माण झाली असता, शेवटी काकांना संरक्षणासाठी पुढं यावं लागलचं... काकानी माफी मागितली... त्याने तीव्रता कमी झाली.. मात्र ‘त्या’ वक्तव्याचा परिणाम काही केल्या कमी होईनाच... मराठी माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्या नंतर हिंदी आणि इंग्रजी चॅनलला देखील याची दाहकता जाणवू लागली... आणि मग खऱ्या अर्थाने गल्ली ते दिल्ली... गाजलं ते ‘दादा प्रकरण….’
आजवर शिवराळ भाषेतील भाषणं ऐकण्याची महाराष्ट्राला ही सवय झाली आहे. ठाकरे कुटुंबांची ठाकरी शैलीतील भाषणं म्हणजे बऱ्याचदा शिवराळ भाषा... मात्र त्यांच्या भाषणांना महाराष्ट्रानेही स्वीकारलं.. पण दादा... तुम्हांलाही महाराष्ट्र ह्या अशा भाषणासाठी स्विकारेल ही तुमची कल्पना मात्र पूर्णत: फोल गेली.. कारण की तुम्ही सत्ता भोगत आहात... एका महत्त्वाचे पद भूषवित आहात... आणि जी सत्ता भोगत आहात किंवा पद भूषवत आहात, ती या जनता जनार्दनाने... तुम्हांला दिलेली…. हो तुम्हांला दिलेलीच ‘भेट’ आहे.... आणि ज्या जनता जनार्दनाने तुम्हांला या पदावर बसवलं त्याच जनतेविरोधात हे भाष्य करणं तुम्हांला शोभतं तरी कसं? तुमच्या प्रत्येक वक्तव्याला किती महत्त्व आहे हे आम्ही तुम्हांला सागणं योग्य नव्हे... कारण आपण काय वक्तव्य करतो आणि त्याचे काय परिणाम होतात याची तुम्हांला आता चांगलीच समज आली असेल.
चूक करायची आणि माफी मागून मोकळं व्हायचं ही प्रत्येक माणसाचीच वृत्ती त्याला तुम्ही तरी कसे अपवाद असाल... अजिबात नसाल... केलेल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यातून केलेल्या गुन्ह्याबद्दल वाटणारी खंत देखील तुम्ही व्यक्त केली. याबाबत कुणाचचं दुमत नाही की तुम्हांला तुमच्या चुकीचं वाईटही वाटतं आहे. मात्र वक्तव्य केल्यानंतर होणाऱ्या परिणामांनाही आता सामोरे जावेच लागेल. मला वाटतं ‘शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा’ असतो... आणि तुम्हांला शब्दाचं महत्त्व तर आता चांगलच कळलं असेल.... तेव्हा दादा जरा जपून जपून.. हे वागणं बरं नव्हं...
(नोंद - मुक्त विचारांचं असं ब्लॉगर्स पार्क असल्याने यातं ब्लॉग लिहताना अनेक मतं व्यक्त होतं असतात. त्यामुळे या ब्लॉगमधील मतांशी `झी २४ तास` सहमत असेलच असे नाही. याची वाचकांनी नोंद घ्यावी)