बागेश्री कानडे
असिस्टंट प्रोड्युसर, www.24taas.com
रात्रीचे नऊ वाजले होते... बोरिवलीला जाणारी लोकल बांद्र्यापर्यंत पोहचली दोन मुली ट्रेन मध्ये चढल्या.. माझ्या समोर येऊन बसल्या. त्यांच्या वागण्यात खूप चल-बिचल होती. काय झाल होतं हे कळत नव्हतं पण त्यांच्या हाव-भावावरुन त्या खूप घाबरलेल्या होत्या हे नक्की..... काय झालं असेल असा प्रश्न मलाही पडला. पण त्यांना काही विचारण्यापेक्षा काय झालयं ते जाणून घ्यायचं मी ठरवलं. दोघी रडवेलेल्या झाल्या होत्या. अचानक त्यातील एकीचा मोबाइल खणखणला... पण फोन रिसीव्ह कसा करणार... हा प्रश्न तिच्यासमोर होता. तिने आपल्या मैत्रीणीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.. मैत्रीणीने तिचा फोन लगेचचं आपल्या हातात घेतला आणि कट केला.
ती मुलगी आपल्या चेह-यावर दोन्ही हातात घेऊन विचार करत बसली होती. आणि दोघींचा संवाद सुरू झाला.. ‘माझ्या घरी काय सांगू? माझा भाऊ आणि वडीलही आले असतील. घरी पोहचेपर्यंत दहा तर नक्कीच वाजतील. काय करु बोल ना तू? का नाही बोलत तू, शांत की बसलीयेस? मला तर जास्त भीती वाटते. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला पुन्हा एकदा फोन कट.. दोघींनी एकमेकांकडे बघितलं पण यावेळी दोघी हसल्या त्या हसण्यामागेही अनामिक अशी भीती होती. अचानक तिच्या मैत्रीणीचं लक्ष स्वत:च्या फोनकडे गेलं तिचा मोबाइलदेखील स्वीच ऑफ झाला होता.
‘आता काय? माझा फोनही स्विच ऑफ झाला घरी मी फोनही करु शकत नाही. ’ पुन्हा तिच वाक्ये तिने म्हणायला सुरवात केली. ‘मी काय करु मला भिती वाटते आहे. माझीतर आज काही खैर नाही काशी होणार आहे.’ तिने आपल्या मैत्रीणीला लगेच उत्तर दिलं. मैत्रीण लगेच म्हणाली ‘माझ्या मोबाईलची बॅटरी संपली’ मैत्रीण तिला म्हणाली तू माझ्या बरोबर नव्हतीस, तू माझं नावही घेऊ नकोस माझ्या भावाला कळलं तर तो तुझ्या भावाला विचारेल. लगेच मैत्रीण म्हणाली, ‘मी घरी काय सांगु’ त्यांचं ते संभाषण तसचं सुरू होतं.
मला आता रहावेना मी लगेचचं म्हणाले, ‘तुम्हाला कॉल करायचाय का? माझा फोन देऊ आणि लगेचच फोन देऊ केला. पण त्या दोघी नाही म्हणाल्या... नको मॅडम, नको मॅडम म्हणत त्यांनी थॅक्स म्हणून मला टाळलं. पण त्यांची अस्वस्थता मला बघवेना. मी त्या दोघींना म्हणाले, ‘घरी कळवा तरी’ त्या दोघी म्हणाल्या ‘नाही हो, भिती वाटतीये’ मी पुढे काहीही विचारले नाही. एवढ्यात माझ्या लक्षात आलं होतं की त्या घरात न सांगता सीफेसवर फिरायला गेल्या होत्या. त्यातील एकीचे तर पायही चिखलाने माखले होते. त्यांना थोडा धीर मिळावा म्हणुन ‘मी त्यांना म्हणाले ठीक आहे एवढ काय घाबरतात उशीर झाला आहे. घरी फोन करुन सुखरुप आहोत असं तरी सांगा’ त्यातील एक म्हणाली ‘नको आता घरी ओरडा तर बसणार आहेच तो घरी जाऊनच ऐकू. आणि माझ्या कॉलेजच्या आठवणी डोळ्यासमोर तराळल्या.
मी म्हणाले ‘होतो कधी उशीर... मी पण अशीच उशीरा घरी गेले आहे आणि तुमच्यासारखाच घरातल्या लोकांचा ओरडाही खाल्लाय...’ हे ऐकून दोघींनाही खूप हसायला आलं, ताण जरा कमी झाला होता दोघींचाही. ट्रेनमध्ये अनाउन्समेंट होत होती पुढील स्टेशन गोरेगाव... त्या दोघी तडक उभ्या राहिल्या आणि स्टेशन आल्यावर घराच्या दिशेने धावत निघाल्या.. मागे वळूनही बघितलं नाही, पण मी त्यांची लगबग मात्र पाहतच राहिली.... आणि कॉलेजच्या आठवणी काढत स्वत:शीच हसले. पण यावेळी एक विचार मनाला शिवून गेला... तो म्हणजे, असं का होतं? हा जनरेशन गॅप आहे की आई-वडिलांचा धाक, आई-वडिलांची विशेषत: ‘मुलीं’बद्दल काळजी? की नेहमी प्रमाणे ‘हे वय असच असतं’ म्हणून सांभाळण्याची धडपड?
आपल्या पाल्यांची काळजी पालकांना काही वर्षांपूर्वी आपणही आपल्या आई-वडिलांना न सांगता कितीदा फिरायला गेलोय... कितीदा पकडलो गेलोय आणि ओरडापण खाल्लाय... यासाठी कारणीभूत ठरते ती वडिलधाऱ्यांना आपली मुले वाईट मार्गाला जाऊ नयेत किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये यासाठी लागलेली काळजी आणि त्याच वेळेस तरुणांना मात्र आपल्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसावं किंवा आपल्याला थोडीतरी मोकळीक असावी मग पार्टीज असो मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला वा पिकनिकला जाणं असो... अशी मोकळीक हवीहवीशी वाटत असते. आणि नेमकं इथंच दोन जनरेशनच्या विचारांत फरक पडतो. त्यातही, मुलांपेक्षा काही बाब