अजित चव्हाण, झी २४ तास, वृत्तनिवेदक
लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी धक्काबुक्कीच्या विरोधात ‘झी मीडिया’नं कुठल्याही दबावाला न झुकता वाचा फोडली आणि अनेकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. लोकमान्यता मिळाली की लोक किती उन्मत्त होतात याचं उदाहरण लालबागच्या मंडपात पाहायला मिळतं. मात्र याबाबत बोलायला मात्र कुणीच तयार नव्हतं. मुंबईत आल्यावर सुरूवातीची पाच वर्ष मी गिरणगावातच काढली. त्यामुळे लालबाग, परळ, सातरस्ता, भायखळा, डिलाईल रोड भागाशी नाळ जुळली. इथल्या सणवारांच्या उत्सवामुळे ती आणखीच घट्ट झाली. सडाफटिंग होतो, त्यामुळे गणपतीच्या काळात लालबागला दर्शनाला येणा-यांनी घर तुडुंब भरलेलं असायचं. अनेकांना नकार देता यायचं नाही म्हणून अनेकदा मंडपापर्यंत जावंच लागे. एकदा आत जाऊन लालबागच्या राजाचं दर्शनही घेतलं. चप्पल हरवल्यानं घामाघूम होवून बाहेर आलो. त्यानंतर मात्र बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेत राहिलो.
लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी दिवसेंदिवस वाढत होतीच. मंडपात आणि माझ्या घरीही... रात्र रात्र जागून माझ्या घरी तावातावानं या विषयावर पत्रकार मित्रांबरोबर अनेकदा चर्चाही घडायच्या. साईंच्या पदयात्राही यातून सुटल्या नाहीत. मुद्दा एकच इथं वेळ वाया घालवण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामासाठी वेळ का देत नाहीत? अनेकांनी ऐकून घेतलं. (मुक्कामाची सोय होती म्हणून...) अनेकांनी उडवून लावलं. काहींना पटलं तर काहींनी बाप्पा रागवेल, अशी भीती घातली... तर नवसाचा आहे गणपती म्हणून येतो बाबा. पुढच्या वेळी त्रास देणार नाही असं म्हणत वर्षानुवर्ष दर्शनाचा नेम चुकवला नाही. काहींना मात्र ते पटलं आणि बाहेरून दर्शन करून त्यांनी समाधान मानलं. असो.....
अशा मानसिकतेची ही गावोगावहून येणारी मित्र मंडळी अर्थाच सगळी तरूण मंडळी. पण मी तान्ह्या मुलांसह २-२ दिवस रांगेत उभे राहणारे महाभागही पाहिले. भाविकांच्या याच मानसिकतेचा फायदा हे राजाचे सेवक घेतायत.. त्यामुळंच या राजाच्या सेवकांना माज चढलाय.. माज हाच शब्द अगदी योग्य आहे. कारण संवेदनशील माणसाला संताप यावा अशी दृष्यं ‘झी २४ तास’नं दाखवली आणि संबंध महाराष्ट्रातच नव्हे, तर जिथे जिथे ही बातमी लोकांनी पाहिले, तिथं संतापाची लाट उसळली. लालबागच्या या बाप्पावर कुणाला हक्क गाजवता येईल का? बरं त्या महिलांना अक्षरक्षः ओढून ढकलणा-या स्वयंसेवकाला असं करायचा अधिकार दिला कोणी? जी वागणूक आपल्यासारख्या सर्वसामान्यांना दिली जाते ती वागणूक दर्शनाला येणा-या सेलिब्रेटींना, नेत्यांना द्यायची हिंमत या टग्यांमध्ये आहे का?
खरंतर महिला भक्तांचं नियोजन करण्यासाठी तिथं महिलाच हव्यात. पण त्याऐवजी बिल्डर लोकांकडे असतात तशा माजलेल्या बाऊन्सर्ससारखा दिसणारा तो टग्या तासनतास रांगेत उभ्या असेलेल्या भक्तांना एक सेकंदही गणपतीसमोर उभं राहू न देता ओढून बाजूला करत होता. त्यातून महिलाच नाही तर महिला पोलीसही सुटल्या नाहीत. मागच्या वर्षी असेच प्रताप या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. एक महिलेला थेट धक्काबुक्की केली, महिला पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली. मागच्याच वर्षी त्यांचा माज उतरवला असता आणि पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर सुधारण्याची आशा होती. मात्र मागच्या वर्षीचं सोडा, यावर्षी महिला पोलिसांच्या बरोबर कार्यकर्त्यांनी केलेली धक्काबुक्की दाबण्याचाच प्रयत्न होतांना दिसतोय.
कार्यकर्त्यांची मुजोरी ‘झी २४ तास’वरून बातमी दाखवली गेल्यानंतर अनेकांनी फोन केले, एसएमएस केले, वॉटस्अप वर बातमी फिरली आणि प्रत्येकानं निर्भीडपणे बातमी मांडल्याचं कौतुक केलं, पाठिंबा दिला. अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आधी तुम्हीच प्रसिध्दी देता आणि मग टीका करता, अस सुनावलंही... बरोबर आहे त्याचं... एखाद्या देवाला लोक गर्दी करत असतील तर लोकांचं माध्यम म्हणून जे लोकांना हवं ते दाखवण्याचं आमचं काम आहे. मात्र जर काही चुकीचं होत असेल तर ते माध्यम म्हणून सहनही करता येणार नाही. आपल्या मंडळाच्या ताकदीच्या, पैशाच्या जोरावर आपण कुणालाही झुकवू शकतो याच अविर्भावात इथं कार्यकर्ते वावरतांना दिसतात. खरंतर १०दिवस साजरा होणा-या या उत्सवात मिरवणे आणि ओळखीच्यांना दर्शन घडवणे हाच उद्योग होतांना दिसतो. हे दर्शन घडवून आणण्यात पोलिस, पत्रकार, नेते यांचा सहभाग देखील आहे. मागच्या वर्षी पालिकेने खड्डे केल्याचा १९ लाख दंड भरा, मग मंडपाला परवानगी देवू अशा राणा भीमदेवी थाटात वल्गना केल्या. मात्र या वर्षी सपशेल शेपूट घालत परवानगी दिली. यावरून काय ते समजता येईल.
देवाला हाताशी धरून देवाचं मार्केटिंग करून कोट्यवधी र