www.24taas.com, बँकॉक
थायलंडचे छलिओ युविध्या यांचे बँकॉक इथे निधन झालं. आता हे कोण बुवा असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. पण तुम्ही एनर्जी ड्रिंक रेड बुलचं नाव नक्कीच ऐकलं असेल नाही का? युविध्या हे रेड बुलचे जनक होते. जगभरात रात्रभर चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये कॅफिनचा डोस असलेलं रेडबुलला प्रचंड मागणी असायची. कॅफिनमुळे न थकता रात्रभर पार्टीत धमाल करता यायची.
अल्प शिक्षण लाभलेल् छलिओंनी साठच्या दशकात एक छोट्या औषधी कंपनीची स्थापना केली. या कंपनीत त्यांनी सुरवातीला अँटीबायोटिक्सची निर्मिती केली पण नंतर त्यांनी कॅफिन तसंच टॉरिन हे अमिनो ऍसिड आणि गुक्युरोनोलॅक्टोन यांच्या मिश्रणातून रेड बुल या एनर्जी ड्रिंकची निर्मिती केलं. थायलंडमध्ये मजूर आणि ट्रक ड्रायव्हर्स ज्यांना थकवा जाणावायचा त्यांना डोळ्यासमोर ठेवून रेड बुलचं मार्केटिंग करण्यात आलं. रेड बुलची नक्कल करणारी आणखीनही पेय बाजारात दाखल झाली.
एका जर्मन कंपनीच्या विक्री प्रतिनिधीला जेव्हा जेट लॅगपासून मुक्तता होण्यासाठी आशियाई औषध कंपन्या सिरप विकतात कळलं. तेंव्हा तो छलिओ यांच्या संपर्कात आला. जगभरात रेड बुलच्या विक्रीसाठी त्यांनी भागीदारी केली. या दोघांनी पाच लाख डॉलर्सची गुंतवणूक केली. रेड बुल गिव्हज यू विंग्ज हे घोषवाक्य या जर्मन विक्री प्रतिनिधीने विक्रीसाठी वापरलं आणि या ड्रिंकने खरोखरच जागतिक बाजारपेठेत भरारी मारली. रात्री जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही रेड बुलला पसंती दिली. त्यानंतर वर्तमानपत्रात व्होडका आणि रेड बुलचं मिश्रण धोकादायक ठरु शकतं अशा स्वरुपाच्या बातम्या आल्या आणि या ड्रिंक बद्दल कुतहूलात भरच पडली आणि अर्थातच विक्रीतही.
रेड बुलने पारंपारिक माध्यमांचा प्रसिद्धीसाठी वापर न करता, विद्यार्थ्यांच्या पार्ट्या, खेळ आणि ऍथलिट इव्हेंट्सचा वापर खुबीने केला. रेड बुलने २०११ साली दिलेल्या माहितीनुसार ४.२ दशलक्ष कॅनची विक्री केली आणि ५.१ दशलक्ष डॉलर्सचं उत्पन्न मिळवलं. फोर्ब्सने दिलेल्या अंदाजानुसार छलिओची संपत्ती पाच बिलियन डॉलर्स इतकी असून तो जगातील २०५ क्रमांकाचा धनाढ्य व्यक्ती आहे. एका गरीब चीनी कुटुंबात जन्मलेल्या छलिओची आई-वडील फळं आणि बदकं विकायचे. आणि हो आपल्या रजनीकांतप्रमाणे छलिओही सुरवातीला बस कंडक्टर होता.
शब्दांकन- मंदार मुकुंद पुरकर