२०११ हे वर्षं कलाक्षेत्रासाठी खरंच खूप अशुभ ठरलं. विशेषतः संगीत क्षेत्राला... भीमसेन जोशींसारखं भारतरत्न गळालं, खेबुडकरांसारखे शब्दप्रभू हरपले, श्रीनिवास खळेंसारखे संगीताची दिव्यानुभुती देणारे संगीतकार आपल्यातून गेले आणि आता संगीतप्रेमींना हा धक्का पचतोय ना पचतोय तोच भारतीय गज़ल गायकीला आपल्या स्वर्गीय आवाजाने भारावून टाकणारे जगजीत सिंग आज स्वर्गस्थ झाले.
जशी उर्दू भाषा या मातीतली तसेच शेर, ग़ज़ल हे प्रकारही. आपल्या देशात शायरांची परंपराही खूप मोठी आहे. अगदी अमीर खुस्त्रो, मीर तक़ी मीर, मिर्झा ग़ालीब पासून ते आजच्या गुलज़ार, निदा फाज़लीपर्यंत अनेकांनी या देशात ग़ज़ल फुलवल्या, सजवल्या. पण, ग़ज़ल गायकीच्या प्रांतात मात्र मेहंदी हसन, गुलाम अली असे ग़ज़ल गायक पाकिस्तानातच निर्माण झाले. कदाचित, आपल्या देशात असणाऱ्या काही गैरसमजांनी आपण गजल या प्रकाराला परकं केलं. तरीही, आपलं अभिजात सौंदर्य घेऊन ग़ज़ल फुलतच राहिली. भारतातून काही गायकांनी आपल्या कंठाने ग़ज़ल गायकीला न्यायही मिळवून दिला. भुपेंद्र, तलत अझिज यांसारख्या गायकांनी ग़ज़लला नवे आयाम मिळवून दिले. पण, या सर्वांत जे नाव प्रामुख्याने समोर येतं ते म्हणजे जगजीत सिंग यांचंच. अनेक फिल्मी, नॉन फिल्मी ग़ज़लांना आपल्या तलम आवाजाचा रेशीमस्पर्श जगजीत सिंगांनी दिला. त्यांच्या जाण्याने फक्त एक महान गायक गेल्याचं दुःख झालं नाही, तर आपल्या संवेदनांना जागं करणारा, जादूने भारलेल्या आवाजाने आपल्याला प्रेम समजावून सांगणारा आवाजच मुक झाल्याची भावना आहे. अनेकांच्या एकांताचा साथीदार म्हणजे जगजीतजींचा आवाज होता.
आपल्याच भावनांचं आपल्यापाशीच कन्फेशन करण्यासाठी लागणारी उर्मी म्हणजे जगजीतजींची गाणी होती. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छिन लो मुझसे मेरी जवानी... लहानपणाच्या अठवणींसाठी इतकं व्याकुळ करणारी भावना तितक्याच उत्कट पद्धतीने जगजीतजींनी गायली, की मध्यम वयीन लोकांनाच नव्हे तर, तरुणांनाही लहानपणीच्या काळात परत जाण्याची इच्छा परत परत निर्माण झाली.
गुलजारजींच्या मिर्झा गालीब या सिरीयल करता जगजीतजींनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ग़ज़ल हे तर संगीतप्रेमींवर केलेले उपकारच आहेत. ‘हज़ारों ख़्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकले’, ‘बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे...’, ‘आह को चाहिये इक उम्र’ अशी कित्येक ग़ज़ल आजही कानात रुंजी घालत आहेत. हे ‘मरासिम’मधील ‘हाथ छुटे भा तो रिश्ते नही तोडा करते...’, ‘एक पुराना मौसम लौटा..’सारख्या ग़ज़ल तर अनेकांच्या मर्मबंधातली ठेव बनून जपल्या गेलेल्या आहेत... त्यांनी गायलेल्या ग़ज़लची यादी सादर करावी तर, त्यासाठी जागा कमी पडेल. पण, त्यांची एक-एक ग़ज़ल मनाच्या कोपऱ्यात घर कऱून राहिली आहे.
फिल्मी ग़ज़स फारश्या गायल्या नसल्या तरी ज्या काही त्यांनी गायल्या त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या गेल्या.. . ‘हे राम’ या त्यांच्या गीताने कित्येकांचे दिवस सुरू होतात.. या अल्बमने खरंच भक्तीगीतांच्या अल्बम्सचे अनेक रेकॉर्ड तोडलेत. ‘जिन ज़ख़्मोंको वख़्त भर चला है, तुम क्यो उन्हे छेडे जा रहे हो ?’ या शब्दांनी कित्येक भंगलेल्या मनांना उभारी दिली असेल ? ‘झुकी झकी सी नजर...ट ने त्यांचा आवाज ऐकण्यास ‘बेकरार’ केलं. ‘होटोंसे छू लो तुम...’ म्हणत कित्येक गीतं ‘अमर’ केली. ‘तुमको देखा तो ये खयाल आया...’ या त्यांच्या गीताने कित्येक जणांचे ‘खयाल’ विणलेत... त्यात ते गातात, ‘तुम चले जाओगे, तो सोचेंगे, हमने क्या खोया, हमने क्या पाया?...’ पण, ते खरंच असे मैफिल अर्धवट सोडून निघून जातील असं वाटलं नव्हतं. कधी रात्री एकटं असताना शांतपणे ‘होशवालोंको खबर क्या...’ ऐकलं की, अंगावरून मोरपंख फरवल्यासारखं वाटतं. मखमली स्पर्श म्हणजे काय याची प्रचिती येते...10 ऑक्टोबरला आमच्यासारख्या होशवाल्या