फ्री बेसिक्स'वर ट्रायच्या निर्णयानं झुकरबर्ग निराश, पण...

भारतीय दूरसंचार नियंत्रण मंडळ म्हणजेच 'ट्राय'नं काल फेसबूकच्या 'फ्री बेसिक्स'ला केराची टोपली दाखवत भारतात नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा दिलाय. या निर्णयाचे तज्ज्ञांनी स्वागत केलंय. पण, या निर्णयाचा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मात्र जोरदार धक्का बसलाय. 

Updated: Feb 9, 2016, 03:44 PM IST
फ्री बेसिक्स'वर ट्रायच्या निर्णयानं झुकरबर्ग निराश, पण...  title=

वॉशिंग्टन : भारतीय दूरसंचार नियंत्रण मंडळ म्हणजेच 'ट्राय'नं काल फेसबूकच्या 'फ्री बेसिक्स'ला केराची टोपली दाखवत भारतात नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा दिलाय. या निर्णयाचे तज्ज्ञांनी स्वागत केलंय. पण, या निर्णयाचा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मात्र जोरदार धक्का बसलाय. 

ट्रायच्या निर्णयामुळे आपण निराश झालो असलो तरी हार न मानण्याचा निर्धार झुकरबर्गनं यानंतर व्यक्त केलाय. 'इंटरनेट डॉट ओआरजी'च्या माध्यमातून बरंच काही करणे शक्य आहे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत इंटरनेट पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही त्या दिशेने काम करत राहू, असं मार्कनं म्हटलंय.  

'आम्ही या निर्णयामुळे निराश झालो आहोत, पण, भारतासह जगभरात लोकांना इंटरनेटशी जोडण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 'इंटरनेट डॉट ओआरजी'च्या माध्यमातून बरंच काही करणे शक्य आहे आणि आम्ही ते सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंत हे काम करतच राहू, असा निर्धार त्यानं व्यक्त केलाय.  

मार्कच्या मते 'फ्री बेसिक्स'च्या माध्यमातून जगातील अनेक देशात महत्त्वाचे बदल पहायला मिळाले आहेत. भारतातही गरीबी दूर करणे, रोजगार निर्माण करणे, शिक्षणाच्या संधींचा प्रसार करणे अशा अनेक गोष्टी फ्री बेसिक्सच्या माध्यमातून करणे शक्य आहे.  

'फ्री बेसिक्स'च्या माध्यमातून काही विशिष्ट सेवा मोफत देऊन इतर सेवांसाठी जादा मूल्य आकारण्याचा मार्क झुकरबर्गच्या 'फेसबूक'चा इरादा होता. याविरोधात अनेकांनी 'ट्राय'कडे आपला आक्षेप नोंदवला होता. इंटरनेट स्वातंत्र्यावर गदा येऊ शकेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.