www.24taas.com, वॉशिंगटन
मी धुम्रपान करत नाही तर मला त्याचा त्रास कसा होणार? अशी वाक्य तुम्ही आत्तापर्यंत हजारो वेळा वापरली असतील. पण तुम्ही स्वत: धुम्रपान करत नसाल तरी इतर धुम्रपान करत असताना त्या ठिकाणापासून लांब राहण्याची सवयही लावून घ्या. कारण, रस्त्यात, बारमध्ये तसंच इतर ठिकाणी धुम्रपान होत असेल आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल तर त्याचा तुमच्या श्वासोच्छवासावरही परिणाम होऊ शकतो.
युनिव्हर्सिटी ऑफ एथेन्स, यूनॉनमध्ये हॅलॅनिक कॅन्सर सोसायटी आणि हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी एका अध्ययनात ही माहिती दिलीय. या अध्ययनासाठी काही लोकांचा सर्व्हे केला गेला. यामध्ये जास्त प्रमाणात धुम्रपान होणाऱ्या ठिकाणी २० मिनिटे थांबलेल्या व्यक्तींना तत्काळ शारीरिक त्रास अनुभवायला मिळाला.
‘युनिव्हर्सिटी ऑफ एथेन्स’च्या पानाजियोटिस बेहराकिस यांनी सांगितले की बारचा स्मोकिंग झोन किंवा बंद कारमध्ये धुम्रपान केल्यामुळे सूक्ष्म कणांची दाट घनता निर्माण होते. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्ती काही वेळा श्वास घेताना त्या कणांच्या संपर्कात येतात. याचा त्रासही त्यांना सहन करावा लागतो. धूम्रपान केल्यानंतर सोडलेल्या धुराच्या अल्पकालिन प्रभावाच्या अभ्यासावरून हे स्पष्ट झालंय की धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या श्वास नलिकांना थोड्या वेळही अशा वातावरणात राहिल्याने अपाय होऊ शकतो.